आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या चित्रीकरणाला सुरुवात:घोषणेच्या वेळी कलाकारांच्या लूकवरून वाद, अक्षय साकारतोय छत्रपतींची भूमिका

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून सुरूवात झाली आहे. मुंबईत चित्रपटाच्या पहिल्या टप्प्याचे चित्रीकरण पूर्ण केले जाणार आहे. या चित्रपटातून बॉलिवूड स्टार अक्षय कुमार मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. या चित्रपटात अक्षय हा छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. अक्षयने नुकतीच एक खास पोस्ट शेअर करत चित्रीकरणाला सुरुवात केल्याचे सांगितले आहे.

अक्षयने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला अभिवादन करताना दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षयने लिहिले, "'वेडात मराठे वीर दौडले सात' या मराठी चित्रपटाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात होत आहे. या चित्रपटात मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याचे भाग्य लाभले आहे. त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आणि माँ जिजाऊंच्या आशीर्वादाने मी पूर्ण प्रयत्न करेन. सर्वांनी आशीर्वाद द्या," असे अक्षय म्हणाला आहे. यासह निर्मात्यांनी अक्षयचा शिवाजी महाराजांच्या लूकमधील एक व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा झाली होती. यावेळी चित्रपटातील कलाकारांचा लूक रिव्हील करण्यात आला होता. मात्र कलाकारांच्या लूकमुळे गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. 'वेडात मराठे वीर दौडले सात' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटात अक्षयसोबतच अभिनेता प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्या मांजरेकर, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे. पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...