आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिवंगत अभिनेत्री नंदा यांची आज 81 वी जयंती आहे. 8 जानेवारी 1939 रोजी कोल्हापुरात त्यांचा जन्म झाला होता. 25 मार्च 2014 रोजी वयाच्या 75 व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले होते. परंतु लोकांच्या मनात अजूनही त्यांच्या आठवणी जिवंत आहेत. त्याचे संपूर्ण नाव नंदा कर्नाटकी होते.
नंदा यांना सैन्यात सामील होऊन देशाची सेवा करायची होती. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, त्यांना बालपणापासूनच आझाद हिंद फौजमध्ये सामील होऊन देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी व्हायचे होते. मात्र, नशिबाने त्यांना कोल्हापूरहून मायनागरीत आणले. नंदा यांनी बॉलिवूड करिअरमध्ये 70 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.
1972 मध्ये आलेला मनोज कुमार यांचe 'शोर' हा मुख्य अभिनेत्री म्हणून नंदा यांचा शेवटचा हिट चित्रपट ठरला होता. या चित्रपटात त्यांनी मनोज कुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. चित्रपटात ट्रेनमधून आपल्या मुलाचा जीव वाचवताना नंदाच्या पात्राचा मृत्यू होतो. या चित्रपटात त्यांनी छोट्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.
नंदा यांच्या घरात फिल्मी वातावरण होते. त्यांचे वडील मास्टर विनायक हे मराठी रंगभूमीवरचे एक प्रसिद्ध विनोदी कलाकार होते. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. नंदा यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी अभिनेत्री व्हावे, परंतु असे असूनही नंदा यांना अभिनयात विशेष रस नव्हता. फार कमी लोकांना माहीत आहे की, नंदा यांचा भाऊ मराठी चित्रपट दिग्दर्शक जयप्रकाश कर्नाटकी हे आहेत. अभिनेत्री जयश्री टी या नंदा यांच्या वहिणी आहेत. महान स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा नंदावर खूप प्रभाव होता. त्यांच्याप्रमाणेच नंदा यांनाही सैन्यात रुजू होऊन देशाची सेवा करायची होती.
नंदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, एकेदिवशी अभ्यास करत असताना त्यांची आई त्यांच्याजवळ आली आणि म्हणाली की, 'तुला तुझे केस कापावे लागतील, कारण वडिलांची इच्छा आहे की त्यांच्या चित्रपटात तू मुलाची व्यक्तिरेखा साकारावी.' आईची ही गोष्ट ऐकून नंदाला खूप राग आला होता. सुरुवातीला त्यांनी केस कापण्यास नकार दिला. मात्र आईने समजावून सांगितल्यानंतर त्या यासाठी तयार झाल्या. चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नंदा यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे तो चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. हळूहळू कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ढासळू लागली. त्यांच्या घराची आर्थिक अवस्था इतकी बिकट झाली की त्यांना त्यांचा बंगला आणि कार विकावी लागली होती.
बेबी नंदा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नंदा यांनी 1948 ते 1956 पर्यंच बालकलाकार म्हणून काम केले. त्यावेळी त्यांनी मंदीर, जग्गु, अंगारे आणि जागृती यांसारख्या चित्रपटात काम केले. चित्रपटात काम करत असल्याने नंदा यांनी घरुनच त्यांचे शिक्षण केले. त्यावेळी त्यांना गोकुळदास माखी हे शिक्षक घरी शिकवायला येत असत.
अभिनेत्री नंदा यांनी कधीच लग्न केले नाही. नंदा यांचा भाऊ आणि आई त्यांच्यासाठी विविध स्थळे आणत असत, पण नंदा यांनी लग्नात कधीच रुची दाखविली नाही. खास मैत्रीण आणि अभिनेत्री वहिदा रहमान यांच्या तीव्र इच्छेमुळे नंदा यांनी वयाच्या 53 व्या वर्षी चित्रपट दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्यासोबत साखरपुडा केला. पण दुर्दैव असे की लग्नाच्या काही दिवस अगोदर जिन्यावरुन पडून मनमोहन देसाई यांचा मृत्यू झाला आणि नंदा या आजन्म अविवाहीत राहिल्या.
'शोर' चित्रपटात काम केल्यानंतर नंदा यांनी वाढत्या वयामुळे चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले होते. याच काळात 'परिणीता', 'प्रायश्चित', 'कौन कातिल', 'असलियत' आणि 'नया नशा' असे चित्रपट आले पण ते सर्व फ्लॉप झाले. एका मागोमाग एक चित्रपट फ्लॉप झाल्याने त्यांनी चित्रपटसृष्टीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.
नंदा यांनी 1981 मध्ये बॉलिवूडमध्ये केले होते पुनरागमन
1981 मध्ये नंदा यांनी 'आहिस्ता आहिस्ता' या चित्रपटाद्वारे चरित्र अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले. या चित्रपटानंतर त्यांनी राज कपूर यांच्या 'प्रेमरोग' आणि 'मजदूर' या चित्रपटांत भूमिका केली. या तीन चित्रपटांत नंदा यांनी पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आईची भूमिका केली होती.
चार दशकांच्या सिने कारकीर्दीत नंदा यांनी अनेक चित्रपटांत दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली, पण कोणत्याही चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार कधीच मिळाला नाही. 'आंचल'साठी त्यांना 1960 मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यांना 'भाभी' (1957), ‘आहिस्ता आहिस्ता’ (1981) आणि‘प्रेमरोग’ (1982) या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि ‘इत्तेफाक’साठी 1969 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
नंदा यांनी भाभी, जब जब फुल खिले, गुमनाम, धुल के फुल, परिणीता, प्रेम रोग, यांसारख्या चित्रपटात काम केले. नंदा यांनी 1982 नंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला आणि त्या केवळ त्यांच्या कुटुंबासोबतच वेळ घालवणे पसंत करत. त्यांच्या वहिदा रेहमान, नर्गिस, आशा पारेख, हेलन, सायरा बानो, माला सिन्हा, साधना, शकीला, जाबीन जलील या इंडस्ट्रीतील खास मैत्रिणी होत्या. नंदा यांना शेवटच्या वेळी मराठी चित्रपट नटरंगच्या स्क्रिनिगदरम्यान 2010 साली पाहण्यात आले. 25 मार्च 2014 रोजीवर्सोवा येथे राहत्या घरी त्यांचा हृद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.