आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:बॉलिवूडच्या दिग्गज नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत कोरोना टाळण्याचा संदेश दिला होता - Divya Marathi
सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत कोरोना टाळण्याचा संदेश दिला होता
  • श्वसनासंबंधी आजाराचा त्रास झाल्याने त्यांना 17 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

बॉलिवूडच्या दिग्गज नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे आज हृदयविकाऱ्याच्या झटक्याने निधन झाले.  त्या 71 वर्षांच्या होत्या. 17 जून रोजी श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

श्वसनासंबंधी त्रास सुरू झाल्याने त्यांना 17 जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे 1.52 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना मधुमेह आणि संबंधित आजार होता. सरोज खान यांची कोरोना व्हायरस चाचणी निगेटिव्ह आली होती. सरोज खान यांच्या पश्चात मुलगा हमीद खान (आता राजू खान नावाने प्रसिद्ध) आणि मुली हिना खान आणि सुकन्या खान आहेत.

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी झाला होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी बालकलाकार म्हणून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1974 मध्ये ‘गीता मेरा नाम’साठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केले आणि त्यांची कारकीर्द सुरु झाली. पण त्यांना खरी प्रसिद्धी मिळाली ती 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातील ‘हवा हवाई’ गाण्यामुळे.

‘चांदनी’ सिनेमातील गाण्यांच्या नृत्य दिग्दर्शनाला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर माधुरी दीक्षित सोबत तेजाब, बेटा अशा सिनेमातील गाण्यांना केलेल्या कोरिओग्राफीला तुफान यश मिळालं. जवळपास 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशेहून अधिक सिनेमांसाठी, दोन हजारांपेक्षा जास्त गाणी त्यांनी कोरिओग्राफ केली होती. हवा हवाई, तम्मा तम्मा, एक दोन तीन, धक धक करने लगा, डोला रे डोला यासारख्या गाजलेल्या गाण्यांची कोरिओग्राफी त्यांनी केली होती. माधुरी दीक्षितवर चित्रीत केलेले ‘कलंक’ सिनेमातील ‘तबाह हो गये’ हे त्यांनी कोरिओग्राफ केलेले शेवटचे गाणे ठरले.

बातम्या आणखी आहेत...