आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी बातमी:हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ कलाकार दिलीप कुमार यांचे निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सकाळी दिलीप साहेबांनी या जगाला अलविदा केले.

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. बुधवारी सकाळी 7.30 वाजता हिंदूजा रुग्णालयात दिलीपकुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिलीप कुमार बर्‍याच दिवसांपासून आजारी होते.काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाच्या त्रासामुळे हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु होते. परंतु बुधवारी पहाटे बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने शेवटचा श्वास घेतला. दिलीप कुमार यांच्या निधनामुळे बॉलिवूड आणि देशात शोककळा पसरली आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावरून दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जून महिन्यात दोनदा करण्यात आले होते रुग्णालयात दाखल
दिलीप कुमार यांना श्वसनाच्या त्रासामुळे 29 जून रोजी दुस-यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांना 6 जून रोजी देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हादेखील त्यांना श्वास घेण्यात त्रास जाणवला होता. त्यावेळी त्यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाले होते. 9 जून रोजी त्यांच्यावर एक लहानशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. वैद्यकीय भाषेत या शस्त्रक्रियेला 'प्ल्यूरल एस्पिरेशन' म्हटले जाते. ही शस्त्रक्रिया मुख्यतः फुफ्फुसात जमा झालेला कफ, श्वास घेण्यास येणाऱ्या अडचणी आणि छातीतील वेदना दूर करण्यासाठी केली जाते. यावेळी सुमारे 350 मिलीलीटर द्रव त्यांच्या फुफ्फुसातून काढून टाकण्यात आला होता. ज्यानंतर दिलीप कुमाराला खूप अशक्तपणा जाणवत होता. या उपचारानंतर त्यांची ऑक्सिजनची पातळी वाढू लागली होती. पाच दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्यांना 11 जून रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

दिलीप कुमार पद्मभूषण, दादासाहेब पुरस्काराने सन्मानित

दिलीप कुमार यांचे खरे नाव मोहम्मद युसूफ खान होते. त्यांनी 'ज्वार भाटा' (1944), 'अंदाज' (1949), 'आन' (1952), 'देवदास' (1955), 'आझाद' (1955), 'मुगल-ए-आजम' (1960), 'गंगा' जमुना (1961), 'क्रांती' (1981), 'कर्मा' (1986) आणि 'सौदागर' (1991) यासह 50 हून अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले.

फिल्मफेअरचे 1954 चे उत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक मिळवणारे दिलीप कुमार हे पहिले अभिनेते होते. त्यांना आठ वेळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1991 मध्ये भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला होता. भारतीय चित्रपटसृष्टीतील महत्वपूर्ण योगदानाबद्दल 1994 ला दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन दिलीप कुमार यांना गौरवण्यात आले होते. राष्ट्रपती कोट्यातून 2000-2006 दरम्यान त्यांना राज्यसभेचे सभासदत्व देण्यात आले होते. पाकिस्तान सरकारने 1998 मध्ये त्यांना ‘निशान-ए-इम्तियाझ’ हा पाकिस्तानमधील सर्वात उच्च असे नागरी पारितोषिक देऊन सन्मानित केले होते.

मागील वर्षी कोरोनामुळे दोन भावांचे निधन
मागील वर्षी दिलीप कुमार यांच्या दोन लहान भावांचे कोरोनामुळे निधन झाले होते. 21 ऑगस्ट रोजी 88 वर्षीय अस्लम यांचे तर 2 सप्टेंबर रोजी 90 वर्षीय अहसान यांची कोरोनामुळे प्राणज्योत मालवली होती. यामुळे सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी 11 ऑक्टोबर रोजी आपल्या लग्नाचा 54 वा वाढदिवस साजरा केला नव्हता.

बातम्या आणखी आहेत...