आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागायक-संगीतकार विशाल ददलानीचे वडील मोती ददलानी यांचे वयाच्या 79 व्या वर्षी निधन झाले. विशालने शनिवारी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. पोस्टमध्ये आपली व्यथा मांडताना विशालने सांगितले की, एक दिवस आधी कोविड पॉझिटिव्ह आल्याने तो त्याच्या वडिलांना शेवटच्या क्षणी भेटायलाही जाऊ शकला नाही. आयुष्यातील या सर्वात कठीण काळात आपल्या आईचे सांत्वन करायलाही जाऊ शकत नसल्याची खंत त्याने व्यक्त केली आहे.
त्यांच्याशिवाय या जगात कसे जगायचे हे मला माहित नाही
विशाल ददलानीने वडिलांचा एक फोटो शेअर करत लिहिले, "श्री. मोती ददलानी (12 मे 1943-8 जानेवारी 2022). काल रात्री मी माझा सर्वात चांगला मित्र, पृथ्वीवरील सर्वात चांगला आणि दयाळू माणूस गमावला. मला माझ्या आयुष्यात त्यांच्यापेक्षा चांगले वडील, त्यांच्यापेक्षा चांगला शिक्षक किंवा चांगला माणूस सापडला नसता. माझ्यामध्ये जे काही चांगले आहे ते त्यांचे सौम्य प्रतिबिंब आहे."
विशाल ददलानीने पुढे लिहिले, "ते गेल्या 3-4 दिवसांपासून आयसीयूमध्ये होते कारण त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती, जी यशस्वी झाली नाही. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण, मी कालपासून त्यांना भेटू शकलो नव्हतो कारण माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती. मी माझ्या आईला तिच्या कठीण काळात मिठी मारायलाही जाऊ शकत नाहीये."
विशाल पुढे म्हणाला, "हे खरंच अजिबात ठीक नाहीये. माझी बहीण सर्व गोष्टींची काळजी घेत आहे. त्यांच्याशिवाय या जगात कसे जगायचे हे मला कळत नाहीये. मी पूर्णपणे हतबल झालोय," अशा शब्दांत विशालने आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. विशालच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कमेंट करत त्याच्या वडिलांना श्रद्धांजली वाहत आहेत. तसेच विशाल आणि त्याच्या कुटुंबियांचे सांत्वन करत आहेत.
एका दिवसाआधी झाली विशालला कोरोनाची लागण
एका दिवसाआधीच विशाल ददलानीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले. पोस्ट शेअर करताना विशाल ददलानीने लिहिले होते, "माझी ही पोस्ट त्या सर्वांसाठी आहे जे गेल्या आठवड्यात किंवा 10 दिवसांत माझ्या संपर्कात आले आहेत. खंत म्हणजे आवश्यक ती सर्व सावधगिरी बाळगूनही, माझी कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी कधीही कुठेही मास्कशिवाय कोणालाही भेटलेलो नाही. माझ्या माहितीनुसार, मी निर्जंतुकीकरण न केलेल्या कोणत्याही गोष्टीला हात लावलेला नाही. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. कृपया काळजी घ्या," असे विशाल ददलानीने सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.