आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केके यांनी कायमचे म्हटले 'अलविदा':लग्नात गाण्याच्या विरोधात होते KK, म्हणाले होते- एक कोटी दिले तरी गाणार नाही

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती : केके

बॉलिवूड गायक केके (कृष्ण कुमार कुन्नथ) यांचे मंगळवारी वयाच्या 53 व्या वर्षी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर निधन झाले. परफॉर्मन्सनंतर ते अस्वस्थ अवस्थेत हॉटेलमध्ये पोहोचले आणि त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना सीएमआरआय (कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. दरम्यान, दरम्यान, केके यांचे एक जुने विधान व्हायरल होत आहे. त्यांना कुणी एक कोटी रुपये दिले तरी ते लग्नसोहळ्यात परफॉर्म करणार नाहीत, असे केके म्हणाले होते.

मला एक कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती : केके
2008 मध्ये एका मुलाखतीत केके यांना विचारण्यात आले होते की, त्यांनी गायक म्हणून कधी कोणती ऑफर नाकारली आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले होते की, "होय, मी लग्नात परफॉर्म करण्यास नकार दिला, त्यांनी मला 1 कोटी रुपयांची ऑफर दिली होती," असे ते म्हणाले होते.

कधी अभिनयात नशीब आजमावणार का? या प्रश्नावर केके म्हणाले होते, "अरे प्लीज... ते राहूच द्या. मी काही पैशांसाठी अभिनय करणार नाही. काही वर्षांपूर्वी मला चित्रपटाची ऑफर आली होती. पण मी चित्रपट करण्यास नकार दिला होता," असा खुलासा त्यांनी केला होता.

केके यांनी हिंदी-तामिळसह 11 भाषांमध्ये गाणी गायली
23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्लीत जन्मलेले प्रसिद्ध पार्श्वगायक कृष्णकुमार कुन्नथ यांना इंडस्ट्रीत केके या नावाने ओळखले जाते. त्यांनी केवळ हिंदीच नाही तर तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली आणि गुजराती चित्रपटांसाठीही गाणी गायली. केके यांनी चित्रपटांमध्ये ब्रेक मिळण्यापूर्वी सुमारे 35,000 जिंगल्स गायल्या होत्या.

'माचीस' चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे केले होते पदार्पण
केके यांनी बॉलिवूडमध्ये 'माचीस' या चित्रपटातील 'छोड आये हम' या गाण्याद्वारे पदार्पण केले होते. 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप तडप' या गाण्याद्वारे त्यांना मोठा ब्रेक मिळाला. याशिवाय केके यांनी 'यारो', 'पल', 'कोई कहे कहता रहे', 'मैंने दिल से कहा', 'आवरापन बंजारापन', 'दस बहाने', 'अजब सी', 'खुदा जाने' आणि 'दिल इबादत', 'तू ही मेरी शब है' सारखी अनेक सुंदर गाणी गायली आहेत.

2000 मध्ये केके यांना 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटातील 'तडप-तडप' या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा गिल्ड फिल्म पुरस्कार मिळाला होता. 2008 मध्ये 'ओम शांती ओम'मधील 'आँखों में तेरी' आणि 2009 मध्ये 'बचना-ए हसीनो' मधील 'खुदा जाने' या गाण्यांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

'पल' या म्युझिक अल्बममधून गायनाची केली होती सुरुवात
2021 मध्ये केके यांना मिर्ची म्युझिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी दिल्लीतील माउंट सेंट मेरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले आणि त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान केके यांनी भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी 'जोश ऑफ इंडिया' हे गाणे गायले होते. त्यांच्या या गाण्यात अनेक भारतीय क्रिकेटर्सही झळकले. केके यांनी 'पल' या म्युझिक अल्बममधून आपल्या गायन कारकिर्दीला सुरुवात केली होती.

बातम्या आणखी आहेत...