आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बप्पी दांचे लता दीदींसोबत होते खास नाते:लता मंगेशकरांना 'मां' म्हणायचे बप्पी लहरी; म्हणाले होते - त्यांच्या पाठिंब्याशिवाय मी काहीच करू शकलो नसतो

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लता दीदींना 'मां' म्हणायचे बप्पी लहरी

गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यानंतर आता ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहरी आपल्यात नाहीत. बप्पी दा यांचे मंगळवारी (15 फेब्रुवारी) वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले. तर 10 दिवसांपूर्वीच म्हणजे 6 फेब्रुवारी रोजी लता मंगेशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. लता दीदींच्या निधनानंतर बप्पी दा यांनी सोशल मीडियावर लता दीदींसोबतचा त्यांचा बालपणीचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

लता दीदींना 'मां' म्हणायचे बप्पी लहरी
बप्पी लहरी यांनी 6 फेब्रुवारी रोजी लता दीदींसोबतचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, "मां." या फोटोमध्ये लहानगे बप्पी दा लता मंगेशकर यांच्या मांडीवर बसलेले दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बप्पी लहरी आणि लता मंगेशकर यांच्यात रक्ताचे नाते नसले तरी दोघेही एकमेकांसाठी आई आणि मुलापेक्षा कमी नव्हते. बप्पी लताजींना 'मां' म्हणायचे. ते त्यांना सरस्वती मानत. बप्पी लहरी यांना जेव्हा लताजींच्या निधनाची बातमी कळली होती तेव्हा ते खूप निराश झाले होते. त्यावेळी ते स्वतः खूप आजारी होते, पण 'आई' गेल्याचे दुःख त्यांना सहन होत नव्हते.

लताजींच्या निधनाने कोलमडले होते बप्पी लहरी
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर बप्पी लहरी यांनी एका मुलाखतीत त्यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दल सांगितले होते. लताजींच्या निधनाने दुःखी बप्पी लहरी स्वतःला सांभाळू शकत नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले होते, "अनेक लोक म्हणतात की त्या माता सरस्वतीचा अवतार होत्या. मी म्हणतो की, त्या साक्षात माता सरस्वती होत्या. मी त्यांना हजार वेळा प्रणाम करतो. त्यांच्या जाण्याने मी पुन्हा एकदा माझी आई गमावली आहे."

बप्पी लहरी पुढे म्हणाले होते, "मी लहान असताना त्यांच्या मांडीवर खेळलोय. गेल्या वर्षी जेव्हा मला कोरोनाची लागण झाली होती, तेव्हा मी 14 दिवस ब्रीच कँडी रुग्णालयात होतो. तेव्हा आई (लता मंगेशकर) माझ्या पत्नीला रोज फोन करायची. त्या दररोज संध्याकाळी सात वाजता फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस करायच्या. मी हॉस्पिटलमधून घरी आलो तेव्हाही त्या खूप काळजीत होत्या, विशेषतः माझ्या आवाजासाठी. 27 नोव्हेंबर 2021 रोजी त्यांनी मला त्यांचे आशीर्वाद आणि भेटवस्तूसह एक सुंदर पत्र पाठवले होते. ती चांदीची राम-लक्ष्मण-हनुमानाची मूर्ती होती. माझ्या बायकोसाठीही त्यांनी साडी पाठवली होती. त्या मला आपला मुलगा मानत असे. मी 2 वर्षांचा असल्यापासून त्या मला ओळखत होत्या.त्या आमच्यासोबत आमच्या कोलकाता येथील घरी येत असत."

लताजींच्या पाठिंब्याशिवाय काहीही करू शकलो नसतो : बप्पी लहरी
एका जुन्या मुलाखतीत बप्पी लहरी यांनी सांगितले होते की, लता मंगेशकर यांच्या पाठिंब्याशिवाय ते काहीही करू शकले नसते. ते म्हणाले होते, "मी 4 वर्षांचा होतो कोलकाता येथील ईडन गार्डन परिसरात जिथे आम्ही राहायचो, तिथे लताजींनी घरी येऊन मला आशीर्वाद दिला होता. माझ्याजवळ मी त्यांच्या मांडीवर बसलेले एक छायाचित्र आजदेखील आहे. त्यांनी माझे वडील अपरेश लहरी यांच्यांसाठी अनेक बांगला गाणी गायली, माझे वडील कोलकाता येथील प्रसिद्ध संगीतकार होते. तेव्हापासून त्यांनी मला पाठिंबा दिला. माझी पहिली रचना 'दादू' या बंगाली चित्रपटासाठी होती, जी त्यांनी गायली होती. जर त्यांनी माझ्यासाठी ते गाणे गायले नसते तर मी स्पर्धेतही उतरू शकलो नसतो. लता मंगेशकर यांच्यासारखे दुसरे कोणी कधीही होणार नाही."

बप्पी लहरी पुढे म्हणाले होते, "माझा पहिला मोठा बॉलिवूड हिट स्कोर होता आमिर खानचे वडील ताहिर हुसैन यांचा 'जख्मी'. त्यात लताजींनी 'अभी भी दुश्मनी' आणि 'आओ तुम्हे चाँद पे ले जायें' ही दोन गाणी गायली होती. दोन्ही गाणी जबरदस्त हिट ठरली होती. त्या चित्रपटात आशा-किशोर यांनी गायलेले 'जलता है जिया मेरा भीगी-भीगी रातों में' हेदेखील हिट ठरले होते. त्यानंतर त्यांनी 'चलते चलते' आणि 'आप की खातिर' ही गाणी गायली जी आजही लोकप्रिय आहेत."

लता मंगेशकर यांनी बप्पी लहरी यांच्या वडिलांसाठीही गाणी गायली होती
बप्पी लहरी आणि लता मंगेशकर यांचे नाते खूप जुने होते. बप्पी दांच्या जन्मापूर्वीच लताजींचे त्यांच्या कुटुंबाशी नाते होते. लता मंगेशकर यांनी बप्पी लहरी यांचे वडील अपरेश लहरी यांनी संगीतबद्ध केलेली बरीच गाणी गायली होती. 'एक बार बिदाई दे मा' हे बंगाली गाणे बप्पी लहरी यांच्या वडिलांनी संगीतबद्ध केले होते आणि ते लता मंगेशकर यांनी गायले होते. यानंतर लता मंगेशकर यांनी बप्पी लहरींसाठी अनेक हिंदी गाणी गायली, ज्यात 'चलते चलते', 'सूनी सेज सजा दूं', 'सइयां बिना घर सुना' आणि 'आओ तुम्हे चाँद पे ले जाएं' यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...