आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सावदा:गाण्याच्या ओढीने सावद्याचा तरुण ‘रिअॅलिटी शो’च्या मंचावर बनला सफाई कामगार, नंतर झाला अंतिम १५ मधला स्पर्धक...त्याची गोष्ट

सावदा / श्याम पाटील2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव जिल्ह्यातील केळी कामगाराच्या मुलाची स्वप्नपूर्तीसाठी धडपड, उद्या प्रीमियर शो

प्रचंड इच्छाशक्ती आणि तिला मेहनतीची जोड असेल तर परिस्थितीही अनुकूल होत जाते असे म्हणतात. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा या लहानशा गावातील युवराज मेढे या तरुणाच्या बाबतीतही तेच घडले. गाण्याच्या ओढीने थेट इंडियन आयडाॅलच्या सेटवर सफाई कामगार म्हणून काम करता करता १२ व्या सीझनमध्ये त्याने स्वत:च ऑडिशन दिली. अंतिम १५ मध्ये तो निवडलाही गेला. शनिवारी (२८ नोव्हेंबर) त्याचा सहभाग असलेला भाग प्रसारित होणार आहे.

सावद्यातील कैलास मेढे पत्नीसह केळीच्या मळ्यात मजुरी करतात. त्यांचा युवराज हा मुलगा लहानपणापासून गाण्यासाठी अक्षरश: वेडा झालेला. गाण्याच्या या वेडाने पोट भरणार नाही हे आईवडील समजावून सांगत होते. पण युवराजच्या ते पचनी पडत नव्हते. १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन त्याने रोजगाराच्या नावाने सावदा सोडले आणि थेट गेला मुंबईला. तिथे भलेही सफाई कामगार म्हणून काम करेल, पण गाण्याच्या सहवासातच राहील ही त्याची जिद्द होती. प्रचंड इच्छाशक्ती आणि कामाच्या शोधासाठी घेतलेली मेहनत यामुळे त्याला इंडियन आयडाॅलच्या सेटवर सफाई कामगार म्हणून नोकरी लागली.

गेल्या दीड वर्षात युवराजने त्या सेटवर संगीत क्षेत्रातल्या महान व्यक्तींकडून एकलव्याप्रमाणे प्रशिक्षण घेतले. सेटवरचे परीक्षक आणि प्रशिक्षक सहभागी स्पर्धकांना काय सूचना करतात हे युवराज लक्षपूर्वक ऐकत होता आणि स्वत:ला त्यानुसार घडवत होता. १२ व्या सीझनसाठी नोंदणी सुरू झाली आणि आपणही ऑडिशन द्यावी हा निर्णय त्याने घेतला. ऑनलाइन नोंदणी करून तो परीक्षकांसमोर गेला तेव्हा ऑडिशन घेत होते प्रख्यात गायिका नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया. ऑडिशनसाठी समोर उभ्या असलेल्या युवराजला नेहा यांनी ओळखले आणि त्याचे कौतुकही केले.

युवराजच्या गाण्याने परीक्षक भारावले
ऑडिशन झाली आणि युवराज टाॅप १५ मध्ये निवडला गेला. पहिल्या भागात त्याने ‘खेळ मांडीयेला’ हे गाणे सादर केले आणि परीक्षकांसह उपस्थित अन्य स्पर्धकही भारावून गेले. येत्या शनिवारी म्हणजे २८ तारखेला हा भाग प्रसारित होणार असून त्यात सावद्याच्या या युवराजाला पाहता येईल. इंडियन आयडाॅल म्हणून निवड होणे ही तर त्याच्यासाठी महत््भाग्याची गोष्ट असेल. ती लढाई मोठी आहे आणि त्यासाठी तो आपले सर्वस्व देईल, असा विश्वास त्याच्या पालकांना आहे. पण अंतिम १५ स्पर्धकांमध्ये निवड होणे हीदेखील त्याच्यासाठी मोठी गोष्ट आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser