आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुगलची अभिनेत्री जोहरा सेहगल यांना मानवंदना:1946 मध्ये आजच्याच दिवशी जोहरा यांच्या 'नीचा नगर'ला कान्समध्ये मिळाला होता सर्वोच्च सन्मान, 'सांवरिया' होता शेवटचा चित्रपट, वयाच्या 102 व्या वर्षी झाले निधन

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 29 सप्टेंबर 1946मध्ये जोहरा यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात झळकला होता.

गुगलने डुडलच्या माध्यमातून दिवंगत भारतीय अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा गौरव केला आहे. जोहरा सेहगल यांची नृत्य मुद्रा दाखवणारे डुडल पार्वती पिल्लई यांनी तयार केले आहे. 29 सप्टेंबर रोजी जोहरा यांचा वाढदिवस किंवा पुण्यतिथी नाही, म्हणून आजच्या दिवशी हे डुडल का तयार केले गेले? हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल.

अभिनेत्री जोहरा सेहगल यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकणारी पहिली भारतीय अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. 29 सप्टेंबर 1946मध्ये जोहरा यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात झळकला होता. इतकेच नव्हे तर या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द पाल्म डी’ओर’ या मानाच्या पुरस्कारावर आपले नाव कोरले होते. याच दिवसाच्या स्मरणार्थ, आज (29 सप्टेंबर) गुगलने खास डुडलद्वारे जोहरा सेहगल यांना मानवंदना दिली आहे.

  • 'सांवरिया' हा होता शेवटचा चित्रपट

रामपूरच्या रोहिल्ला पठाण या नवाबी राजघराण्यात 27 एप्रिल 1912 रोजी जोहरा सेहगल यांचा जन्म झाला होता. त्यांचे बालपण उत्तराखंडच्या चकराता येथे गेले. त्यांनी 1935 मध्ये डान्सर म्हणून करिअरची सुरुवात केली होती. सात दशकांपर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत योगदान देणा-या जोहरा यांचा शेवटचा चित्रपट 2007 मध्ये प्रदर्शित झालेला सांवरिया हा होता. 10 जुलै 2014 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्या 102 वर्षांच्या होत्या.

  • थिएटरमधून चित्रपटांचा प्रवास

1945 मध्ये त्यांनी पृथ्वी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. जोहरा ‘इप्टा’च्या सदस्यदेखील होत्या. ‘पृथ्वी थिएटर’मधून त्यांनी अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्या उत्कृष्ट नृत्यांगना होत्या. ‘इप्टा’मुळेच चेतन आनंद यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट जोहरा यांच्या वाट्याला आला होता. चित्रपटांमध्ये आल्यानंतरदेखील त्यांनी रंगभूमी सोडली नव्हती. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी ‘दिल से’, 'हम दिल दे चुके सनम', 'चीनी कम', 'कभी खुशी कभी गम', ‘वीर-जारा’ आणि 'सांवरिया' या चित्रपटांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारल्या.

  • जोहरा सेहगल यांचे कुटुंब

जोहरा 14 ऑगस्ट 1942 रोजी वैज्ञानिक कमलेश्वर सेहगल यांच्याशी विवाह केला. भारत-पाक फाळणीदरम्यान त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यांना किरण ही मुलगी आणि पवन हा मुलगा आहे. अखेरच्या काळात त्या आपल्या मुलीसोबत वास्तव्याला होत्या.

  • मुलीने लिहिली 'जोहरा सेहगल: फॅटी' नावाने बायोग्राफी

2012 साली मुलगी किरणने 'जोहरा सेहगल: फॅटी' हे त्यांचे आत्मचरित्र लिहिले होते. ओडिशा नृत्यांगणा असलेल्या किरणने शेवटच्या काळात आपल्या आईला सरकारी फ्लॅटला न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती.

  • पुरस्कार

1963: संगीत नाटक अकादमी

1998: पद्मश्री

2001: कालिदास पुरस्कार

2002: पद्मभूषण

2004: संगीत नाटक अकादमी फेलोशिप

2010: पद्मविभूषण

बातम्या आणखी आहेत...