आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आई कुठे काय करते'च्या सेटवरील पडद्यामागील गोष्ट:मिलिंद गवळी म्हणतात - 'तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही, आप्पांमधील बापमाणूस मी त्यादिवशी अनुभवला’

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही आठवड्यांपूर्वी किशोर महाबोले यांच्या वडिलांचं निधन झालं.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद गवळी यांनी मालिकेतील त्यांचे बाबा म्हणजेच आप्पांसोबतचं नातं अधोरेखित करणारी एक पोस्ट नुकतीच शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये मिलिंद गवळी म्हणतात, ‘आई कुठे काय करते मालिकेत आप्पा आणि अनिरुद्ध देशमुख जवळजवळ दीड वर्ष मनातल्या भावनांशी खेळत आहेत. अनिरुद्धचा आप्पांवर खूप जीव आहे. खऱ्या आयुष्यातही आप्पांची भूमिका साकारणाऱ्या किशोर महाबोले यांच्यावर माझा खूप जीव आहे. त्यांच्याविषयी प्रचंड आदर आणि खूप प्रेम आहे. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. असंख्य कविता त्यांच्या मुखोद्गत आहेत. व. पु. काळेंचं साहित्य तर त्यांचं तोंडपाठ आहे. मोठमोठे डायलॉग त्यांचे असे पाठ असतात. अतिशय बुद्धिमान, मेहनती आणि हसमुख आप्पांशिवाय सेटवर कोणालाच करमत नाही.'

पुढे मिलिंद सांगतात, 'आप्पा हे पात्र सगळ्यांनाच आवडतं. माझी आणि त्यांची ओळख आई कुठे काय करते च्या सेटवरच झाली. पहिल्या दिवसापासूनच त्यांच्या मिश्किल स्वभावाने मन जिंकून घेतलं. पण एकदा का तार सटकली मग ते कुणाचच ऐकत नाहीत. या दीड वर्षांमध्ये एकदा दोनदाच ते रागावले होते आणि क्षणात शांतही झाले. कारण काय तर कोणी तरी त्यांचा चार्जर लंपास केलं आणि त्यांना त्यांचा मोबाइल चार्ज करता आला नाही आणि त्यांच्या बायकोशी त्यांना बोलता आलं नाही म्हणून ते रागावले होते. त्या दिवशी कळलं की बायकोवर त्यांचं किती प्रेम आहे आणि तिला ते किती मिस करतात.'

पुढे मिलिंद सांगतात, 'किशोरजींना एकुलती एक मुलगी आहे तिच्यावर ते छोट्या छोट्या गोष्टींसाठी अवलंबून असतात, ती म्हणेल तसं ते करतात. कोरोनाच्या कठीण काळामध्ये आम्ही एकत्रच शूटिंग करत आहोत. खूप धैर्याने आणि शांतपणे आम्हाला सगळ्यांना आधार देत ते त्यांचं काम चोख बजावत आहेत.'

'काही आठवड्यांपूर्वी त्यांच्या वडिलांचं निधन झालं. जेव्हा ही बातमी त्यांना कळली तेव्हा आमचा एक मिश्किल असा सीन सुरू होता. वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून ते हादरून गेले. आमचे दिग्दर्शक रवी करमरकर यांनी आप्पांना ताबडतोब सोलापूरला निघायला सांगितलं. मात्र आप्पा म्हणाले सीन पूर्ण करुनच निघतो. तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून कधीही जाणार नाही. त्यांच्यातला बापमाणूस मी त्यादिवशी अनुभवला,’ असे मिलिंद गवळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...