आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंटरनेटवरील लाइव्ह नाटक:अभिषेक बच्चनने केले 'नेटक.लाइव्ह' (Netak.live) चे लाँचिंग, म्हणाला - 'मोगरा' बघण्यास उत्सुक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मराठी रंगभूमीवरील आणखी एक आगळा आणि क्रांतिकारी प्रयोग म्हणून याकडे बघितले जात आहे.

आपल्या सगळ्यांचा आवडता, हरहुन्नरी कलाकार हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वहिले नेटक म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक 'मोगरा'चा रविवारी 12 जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे.  

'नेटक.लाइव्ह' (Netak.live) या प्लॅटफॉर्मचे लाँचिंग बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन यांनी नुकतेच केले आहे. या नाट्यप्रयोगाची स्तुती करताना आपण हा प्रयोग पाहण्यास अधीर झालो आहोत, असेही अभिषेक म्हणाला आहे. 

या प्लॅटफॉर्मचे अनावरण केल्यावर अभिषेकने एक बोलके ट्वीट केले आहे. “अत्यंत अद्वितीय, अग्रणण्य आणि विस्मयकारक असा हा प्रयोग माझा मित्र आणि सहकारी हृषिकेश जोशी घेऊन येत आहे. त्याला माझ्या शुभेच्छा. मी हा प्रयोग पाहण्यास आतूर आहे,” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 

काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांमध्ये “शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात 12 जुलै रोजी” असा संदेश फिरला आणि सर्वांच्याच भुवया ऊंचावल्या होत्या. मराठी नाट्यरसिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. नाटक सुरु होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे राहिले. त्या सगळ्या शंकांची आणि प्रश्नांची उकल आता झाली आहे.

तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात अभिनेत्री स्पृहा जोशी, भार्गवी चिरमुले, वंदना गुप्तेसुद्धा असणार आहेत. नाटकाला अजित परब यांचे संगीत आहे. या नाटकाचा टीझर देखील रिलीज करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सादर होणाऱ्या या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

0