आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोस्टर आउट:आता रंगणार ‘खुर्ची’चा खेळ, ‘आता खुर्ची आपलीच..’ म्हणत प्रमुख भूमिकेत झळकणार 'डॅडीं'चा जावई

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह राजकीय नाट्याचा अंदाज दर्शविणारे ‘खुर्ची’ सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित

सत्ता हा शब्दच राजकारण सुरू होण्यास कारणीभूत आहे. राजकारणात मिळणाऱ्या सत्तेचा वापर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो. हेच राजकारण आपल्याला हल्ली चित्रपटांच्या माध्यमातूनही पाहायला मिळत आहे. सत्तेमधील महत्वाचा भाग म्हणजे खुर्ची. खुर्ची साठी होणाऱ्या राजकारणाची झलक आपण याआधी ‘सामना’, ‘सिंहासन’ आणि ‘धुरळा’सारख्या चित्रपटांमधून पाहिली. सत्तेच्या अभावी जाऊन सत्तेसाठी काहीही करणाऱ्या राजकारण्यांच्या वागणुकीमुळे सामान्य कुटुंबांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे पहायला मिळाले. मात्र या राजकारणाचा लहान मुलांवर काय परिणाम होतो हे पहिल्यांदाच ‘खुर्ची’ या आगामी सिनेमातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

‘आराध्या मोशन फिल्म्स’ प्रस्तुत संतोष वसंत हगवणे निर्मित आणि दिग्दर्शक अविनाश खोचरे पाटील आणि ‘ऍक्ट प्लॅनेट टिम’ दिग्दर्शित ‘खुर्ची’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या पोस्टर मध्ये खुर्चीसाठी करण्यात आलेली लढाई उघडपणे पाहायला मिळत आहे.

‘आता खुर्ची आपलीच..’ या टॅगलाईन सह हे पोस्टर राजकीय नाट्याचा अंदाज दर्शवीत आहे. या चित्रपटात अभिनेता आर्यन संतोष हगवणे, अक्षय वाघमारे आणि अभिनेत्री श्रेया पसलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.

अक्षय वाघमारे हा ‘डॅडी’ अर्थात अरुण गवळी यांचा जावई आहे. अक्षयने गेल्यावर्षी मे महिन्यात अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी हिच्याशी लग्नगाठ बांधली असून, लवकरच तो बाबा होणार आहे. या चित्रपटात अक्षयने ‘सम्राट’ नावाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. खेड्यात राहणारा आणि गावात नावलौकिक असलेला, ऐन उमेदीत अर्थात वयाच्या 25 वर्षी स्वतःच्या धुंदीत राहणाऱ्या, मात्र संपूर्ण गावावर स्वतःचे वर्चस्व असणाऱ्या ‘सम्राट’ या मुलाचे पात्र तो या चित्रपटात साकारत आहे. अक्षयची ही आगळीवेगळी आणि दमदार भूमिका नक्कीच साऱ्या प्रेक्षकांना भावेल यात शंकाच नाही.

ग्रामीण राजकारणाचा आजवर न पाहिलेला पैलु ‘खुर्ची’ या सिनेमाद्वारे लवकरच मोठ्या पडद्यावर झळकण्यास सज्ज होत आहे.

बातम्या आणखी आहेत...