आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हार्दिक जोशीने दिला कारकीर्दीच्या आठवणींना उजाळा:म्हणाला - माझ्यातील अभिनयाच्या सुप्त गुणाची जाणीव गणेशोत्सवाच्या काळातच झाली

वैशाली करोले|औरंगाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत वाढलेले हिंदी कलाकार असोत वा मराठी नाटक, सिनेमा, मालिकांमधील अभिनेते असोत, सोसायटीतला गणपती, गल्लीतलं गणेश मंडळ हाच अनेकांसाठी स्वत:तील कलेची जाणीव करून देणारा, सादरीकरणाची संधी देणारा उत्सव. कलेची देवता हे बाप्पाचं नाव यांचे अनुभव सार्थ ठरवतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्ताने मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता हार्दिक जोशीने "दिव्य मराठी'साठी दिलेला हा आठवणींचा उजाळा.

हार्दिक सांगतो, "माझ्यातील ख-या कलागुणांना वाव गणेशोत्सव मंडळातूनच मिळाला. माझ्या वडिलांनी 1982 मध्ये आम्ही पुर्वी जिथे राहायचो त्या वड्याळ्यातील अँटॉप हिल येथील इमारतीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. आमच्या मंडळाचा पाच दिवसांचा गणपती असतो. आदिनाथ गणेशोत्सव मंडळ असे त्याचे नाव आहे. 1985 पासून आमच्या घरी बाप्पाचे आगमन सुरु झाले. माझ्या घरीसुद्धा पाचच दिवसांचा बाप्पा असतो. 1988 चा माझा जन्म आहे. त्यामुळे जेव्हापासून कळायला लागले, तेव्हापासून मी गणेशोत्सव मंडळात सहभागी झालो. खरं सांगायचे झाले तर मला कधीच या इंडस्ट्रीत यायचे नव्हते. मला आर्मीत जायची इच्छा होती. मराठी शाळेत असल्याने स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची संधी मिळायची. पण अभिनय हा सुप्त गुण आपल्यात आहे, याची जाणीव मला गणेशोत्सवाच्या काळातच झाली. लहान असताना छोटीछोटी विनोदाची पुस्तके यायची. ती आम्ही गोळा करुन ठेवायचो आणि त्यातून आम्ही छोटे छोटे स्कीट करायचो. त्यात माझा मित्र संग्राम समेळसुद्धा असायचा. आम्ही गणपतीमध्ये स्कीट करायचो, डान्स करायचो. तेथूनच अभिनयातील सुप्तगुणांना वाव मिळत गेला. खरं सांगायचे तर घरी गणपती असला तरी फक्त आरती आणि जेवायला घरी असायचो आणि आणि दिवसभर खाली मंडळातच आम्ही असायचो."

पुढे हार्दिक सांगतो, "आमचं मंडळ फारसे मोठे नव्हते. पण आमच्या मंडळात विविध स्पर्धा व्हायच्या. संगीत खुर्ची, क्रिकेट मॅचेस, स्मरणशक्ती स्पर्धा, फॅन्सी ड्रेस, आंधळी कोशिंबीर, डान्स कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. म्हणजे तिसरा आणि चौथा दिवस भरभरुन असायचा. मी जे पहिले सादरीकरण केले होते एक विनोदी स्किट केले होते. आजही वेळ असेल तेव्हा अँटॉप हिलला गणेशोत्सव मंडळात फेरफटका मारुन येतो. खरं तर आता तिथे माझे मित्र नाहीत. सगळे आता बाहेर गेले आहेत, कुणी अमेरिकेत आहे, कुणी वाशीला गेले, जेव्हा सगळे एकत्र येतात, तेव्हा आम्ही मंडळात एकत्र भेटतो. बालपणीच्या गणेशोत्सवाच्या अशा अनेक आठवणी आहेत."

यंदाच्या गणेशोत्सव कसा साजरा करणार याबाबत हार्दिक सांगतो, "नुकतीच आमची तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका संपली आणि आता चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. पण गणपतीत आम्ही शूटिंगला सुटी ठेवली आहे. गणपतीच्या आधीचे शेड्यूल आम्ही संपवले आहे आणि पुढील चित्रीकरण आम्ही गणपतीनंतर 10 दिवसांनी सुरु करणार आहोत. यंदा दोन वर्षांनी मी गणपतीला घरी आहे. त्यामुळे जास्त आनंदी आहे. कोरोनाच्या काळात कोल्हापूरला होतो, तेव्हा प्रवासाला बंदी होती. आणि मागील वर्षी नाशिकमध्ये मालिकेचे चित्रीकरण सुरु होते. नवीनच मालिका असल्याने कट टू कट चित्रीकरण सुरु होते. त्यामुळे घरी जाता आले नव्हते. आमच्या घरी पाच दिवसांचा बाप्पा असतो. मी गणपतीत बाप्पाच्या पायाशी झोपतो. बालपणापासून सुरु असलेला हा क्रम आजही तसाच सुरु आहे. मी आजही गणेशोत्सवात घरी बाप्पाच्या पायाशीच झोपतो."

यंदा हार्दिकने त्याची भावी पत्नी आणि अभिनेत्री अक्षया देवधरसोबत गणेशोत्सव साजरा केला.
यंदा हार्दिकने त्याची भावी पत्नी आणि अभिनेत्री अक्षया देवधरसोबत गणेशोत्सव साजरा केला.

गणपतीकडे काय मागणे आहे, यावर हार्दिक म्हणतो, "बाप्पाला एवढंच मागतो की, सगळ्यांना सुखात ठेव आणि आनंदात ठेव, सगळ्यांना चांगल वागण्याची माणुसकी जपण्याची सुबुद्धी दे. मला वाटतं की बाप्पाला सांगण्याची काही गरज नाहीये. आपलं सगळं चक्र तोच चालवतो," असे हार्दिक म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...