आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा शिवबाच्या शिलेदारांची:‘जय भवानी जय शिवाजी’मध्ये कश्यप परुळेकर साकारणार नेताजी पालकर, म्हणाला - अभिनेता म्हणून या भूमिकेतून मी संपन्न होतोय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऐतिहासिक भूमिका साकारण्यासाठी कश्यपची उत्सुकता शिगेला

स्टार प्रवाहवर 26 जुलैपासून भेटीला येणाऱ्या ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या प्रोमोजना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ही मालिका आहे. या ऐतिहासिक मालिकेत अभिनेता कश्यप परुळेकर नेताजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.

नेताजी पालकर हे स्वराज्याच्या लढ्यातलं एक महत्त्वपूर्ण नाव. त्यांना प्रतिशिवाजी असं देखील म्हटलं जायचं. स्वराज्याच्या हितासाठी आणि शिवरायांवर असलेल्या निष्ठेपायी त्यांनी शत्रुच्या गोठात राहणं देखील स्वीकारलं. अशा या शूरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझं भाग्य आहे अशी प्रतिक्रिया अभिनेता कश्यप परुळेकर याने व्यक्त केली.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगतान कश्यप म्हणाला, ‘स्टार प्रवाहसोबत खूप जुनं नातं आहे. अगदी मन उधाण वाऱ्याचे मालिकेपासून सुरु झालेला हा प्रवास अविरत सुरुच आहे. या मालिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा मी लगेच होकार दिला. एकतर मालिकेची कल्पनाच फार वेगळी आहे. शिवरायांच्या शिलेदारांची गोष्ट मालिकेतून भेटीला येणार आहे. त्यामुळे नेताजी पालकर साकारणं माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक आहे.'

पुढे कश्यपने सांगितले, 'याआधी एक ऐतिहासिक सिनेमा केला आहे. त्यामुळे तलवारबाजी आणि घोडेस्वारी याच प्रशिक्षण घेतलं होतं ज्याचा फायदा नेतोजी साकारताना होतो आहे. या भूमिकेसाठी लागणारा फिटनेस, एनर्जी, लवचिकता यावर मी मेहनत घेतोच आहे. सोबतच भाषेवरही मी विशेष लक्ष देतो आहे. नेतोजी साकारण्यासाठी घाटावरची भाषा आणि त्या भाषेचा लहेजा आत्मसात करतो आहे. एक अभिनेता म्हणून या भूमिकेतून मी संपन्न होतोय असं म्हटलं तरी चालेल.’

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती दशमी क्रिएशन्सची असून 26 जुलैपासून रात्री 10 वाजता छत्रपती शिवरायांच्या शिलेदारांची ही गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...