आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिअ‍ॅक्शन:'मुलगी झाली हो' मालिका बंद होणार असल्याचे कळताच किरण माने म्हणाले - 'त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत उत्तर दिलं याचं समाधान'

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • किरण माने यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

छोट्या पडद्यावरील 'मुलगी झाली हो' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा आहे. ‘तुझेच मी गीत गात आहे’ या नवीन मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून ही चर्चा रंगू लागली आहे. येत्या 2 मे पासून ही नवी मालिका रात्री 9 वाजता प्रसारित होणार आहे. त्यामुळे याच वेळेत प्रसारित होणारी 'मुलगी झाली हो' ही मालिका बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या मालिकेत विलास पाटील ही व्यक्तिरेखा साकारुन घराघरांत पोहोचलेले अभिनेते किरण माने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वी सहकलाकारांनी किरण माने यांच्यावर गैरवर्तन करत असल्याचे आरोप केले होते. शिवाय ते राजकीय भूमिका घेतात म्हणून त्यांना या मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. पुर्वसूचना न देता त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आल्याचे किरण माने यांनी म्हटले होते. यानंतर बराच वाद रंगला होता. या वादानंतर आता ही मालिका बंद होणार असल्याचे समजताच त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत, वाढदिवशी प्रेक्षकांनीच मोठे गिफ्ट दिल्याचे ते म्हणाले आहेत. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सीरियलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच ‘प्राईम टाईम’मधून लाथ घालून हाकलली, असे ते म्हणाले आहेत.

किरण माने यांची फेसबुक पोस्ट
किरण माने म्हणतात, "प्रेक्षक लै लै लै नादखुळा असत्यात भावांनो... मला काल वाढदिवसाची सगळ्यात मोठी गिफ्ट कुनी दिली आसंल, तर ती प्रेक्षकांनी ! जी गोष्ट भलेभले करू शकले न्हाईत, ती त्यांनी एका रट्ट्यात केली !! एका माजोरड्या प्रॉडक्शन हाऊसचा नक्षाच उतरवला. कटकारस्थान रचून मला बाजूला केल्यानंतर त्या सिरीयलचा टीआरपी असा काय घसरला की चॅनलनं ती अख्खी सिरीयलच 'प्राईम टाईम'मधून लाथ घालून हाकलली !!!

जी सिरीयल शहरी आणि ग्रामीण विभागात मिळून सलग दीड वर्ष बहुतांश एक नंबरवर आनि बर्‍याचदा पहिल्या तीन नंबरमध्ये असायची. ती तीन म्हैन्यात रसातळाला गेली. आता मे महिन्यापासून ती सिरीयल, अतिशय महत्त्वाच्या समजल्या जानार्‍या 'स्पेशल प्राईम टाईम'ला दिसनार नाय. फक्त तीन म्हैन्यात हे घडलं. ह्याला म्हन्त्यात 'पोएटिक जस्टिस'.

ही गोष्ट साधी नाय भावांनो. सर्वसामान्य जन्तेनं मनावर घेतलं तर काय होऊ शकतं याचं लै लै लै खतरनाक उदाहरन हाय. 'खरा न्याय' सर्वसामान्य जन्तेच्या दरबारात असतो. लोकप्रतिनिधी निवडतानाबी जन्तेनं अशीच ताकद दाखवली तर भल्याभल्यांना धोबीपछाड बसू शकते, हे इतिहासानं दाखवून दिलंय. "ये पब्लीक है ये सब जानती है" असं त्यो राजेश खन्ना डोळं मिचकावत म्हनत नाचायचा, ते काय खोटं न्हाय.

...कुनाला वाटत आसंल आता किरन माने नाचत आसंल, खुश झाला आसंल. नाय भावांनो. लढाई संपलेली नाय. मी कायदेशीर मार्गानं लढून तो न्यायबी मिळवनारच हाय. सुट्टी देनार नाय या भंगारांना. पन काही 'बिकाऊ' कलाकारांनी माझ्यावर जे आरोप केले, त्या सगळ्यांना प्रेक्षकांनीच सनसनीत, कचकटून थोबाडीत देऊन उत्तर दिलं याचं समाधान मात्र नक्की हाय.

कुनीतरी सांगीतलं की ती सिरीयल आता दुपारी दाखवनारेत. हे तर लै बेक्कार भावांनो. एखाद्या यशस्वी पोलीस इन्स्पेक्टरचं अचानक एक दिवस डिमोशन करून त्याला ट्रॅफिक हवालदारची ड्यूटी द्यावी तसं हाय हे ! यातही समाधान हे की जे बिचारे हातावर पोट असनारे असत्यात ते स्पॉटबॉय पासून मेकअपमन हेअरड्रेसर पर्यन्त त्यांचं पोट सुरू र्‍हानार. बाकी माजोरडे कलाकार कर्मानं मरनार. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय अशी गत हुनार. जिथं फुलं वेचली तिथं गवर्‍या वेचायची वेळ येनार. असो. माझ्यावर कटकारस्थान रचून फायदा कुनाचा झाला आनि नुकसान कुनाचं झालं यावर एक चिंतन शिबीर घ्यावं त्यांनी.

बाकी वाढदिवस लैच भारी गेला. तुमच्या शुभेच्छांच्या वर्षावानं भारावून गेलो. या वर्षीचा वाढदिवस 'स्पेशल' बनवला तुमी. एकेक पोस्ट वाचताना आनंदाश्रू येत होते. लब्यू लब्यू लब्यू लैच मित्रमैतरनींनो ! तुमाला अभिमान वाटंल आसंच काम माझ्या हातनं होत र्‍हाईल याची खात्री देतो. मनापास्नं आभार.
- किरण माने.

किरण माने यांची ही फेसबुक पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे. आता खरंच मुलगी झाली हो ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय की दुपारच्या वेळेत प्रसारित होईल, याबाबत लवकरच उलगडा होईल.

बातम्या आणखी आहेत...