आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शूटिंग अपडेट:'देवा श्री गणेशा' मालिकेत अभिनेता पंकज विष्णू साकारणार शिवशंकर, भूमिकेसाठी फिजिकवर दिलं विशेष लक्ष

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका अद्वैत कुलकर्णी तर पार्वतीची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारणार आहे.

स्टार प्रवाहवर 22 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘देवा श्री गणेशा’ मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेतल्या गणपती बाप्पा आणि माता पार्वतीचा लूक याधीच समोर आहे. त्यामुळे शिवशंकाराची भूमिका कोण साकारणार याविषयी कुतूहल होतं. शिवशंकराची भूमिका साकारणार आहे अभिनेता पंकज विष्णू. या पौराणिक भूमिकेसाठी ते खूपच उत्सुक आहेत.

या भूमिकेविषयी सांगताना पंकज विष्णू म्हणाले, ‘देवा श्री गणेशा ही मालिका गणेश चतुर्थीपासून सुरु होत आहे. या पवित्र महिन्यात साक्षात शिवशंकर साकारायला मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. मी खूप वर्षांनंतर मराठी मालिकेत काम करत आहे त्यामुळे प्रचंड उत्सुक आहे. कोणतंही पात्र साकारताना ते पूर्णपणे समजून घेणं गरजेचं आहे. शिवशंकराला आपण भोले नाथ म्हणतो. तो जसा भोळा आहे तसाच त्याचा रौद्र अवतारही पाहायला मिळतो. त्यामुळे भोलेनाथाच्या या दोन्ही छटा मालिकेत साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. रोलसाठी आवश्यक ती तयारी मी केलीच आहे. पण खास बात म्हणजे मी माझ्या फिजिकवरही विशेष लक्ष दिलं आहे. एक कलाकार म्हणून प्रत्येक भूमिका पूर्णपणे झोकून देऊन करायला हवी असं मला वाटतं', असे विष्णू म्हणाले.

पुढे ते म्हणतात, 'देवा श्री गणेशा या मालिकेतून गणपतीच्या 11 दिवसांत बाप्पा विषयीच्या अशा 11 गोष्टी पाहायला मिळतील ज्याची आपल्याला फारशी माहिती नाही. स्टार प्रवाह आणि स्वस्तिक प्रॉडक्शन्सच्या रिसर्च टीमने यावर खूप मेहनत घेतली आहे. मालिकेचा सेट, आम्हा कलाकारांचा लूक सारं काही भव्यदिव्य आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात आजवर इतकी भव्यदिव्य मालिका प्रेक्षकांनी पाहिली नसेल. त्यामुळे देवा श्री गणेशा ही 11 भागांची मालिका नक्कीच वेगळी ठरेल याची मला खात्री आहे.’

या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका अद्वैत कुलकर्णी तर पार्वतीची भूमिका अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारणार आहे. 11 भागांची ही विशेष मालिका 22 ऑगस्टपासून रात्री 8.30 वाजता प्रसारित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...