आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः सोशल मीडियावर एका व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. कोरोनाविषयी खुलासा करताना मी कोरोनाच्या परीक्षेत काठावर पास झालोय, असे ते म्हणाले आहेत. सोबतच खबरदारी म्हणून डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचे मुंबईत होणारे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओत 61 वर्षीय प्रशांत दामले यांनी सांगितल्यानुसार, बुधवारपासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे त्यांना बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहेत. त्यांच्यासोबत काम करणारे सह-कलाकार आणि बॅक स्टेजची टीम निरोगी असल्याचे त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
बघा काय सांगताहेत प्रशांत दामले...
प्रशांत दामले यांच्या 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग लॉकडाउननंतर पहिल्यांदाच 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.
दरम्यान, जवळपास आठ महिन्यांनी नाट्यगृह सुरू झाली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड यांनी स्वतः नाट्यगृहांमध्ये जाऊन काही काळ तिकीट विक्री केली आणि तयारीचा आढावा घेतला होता. त्यांच्या रिओपनिंगच्या प्रयोगला हाऊसफुलचा बोर्ड झळकला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.