आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आई कुठे काय करते’:अनिरुद्ध देशमुखच्या भावाच्या भूमिकेत होतेय अभिनेते शंतनू मोघेची एंट्री, भूमिकेविषयी म्हणाला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे साकारणार अविनाश देशमुख

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत लवकरच अनिरुद्ध देशमुखचा भाऊ म्हणजेच अविनाश देशमुखची एंट्री होणार आहे. मालिकेत आजवर या पात्राविषयी आपण ऐकत आलोय. पण आता अविनाश देशमुखांच्या घरात दाखल होणार आहे. प्रसिद्ध अभिनेता शंतनू मोघे अविनाश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

या मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना शंतनू म्हणाला, ‘आई कुठे काय करते मालिकेचा मी मोठा चाहता आहे. माझ्या घरातल्या सर्वांचीच ही आवडती मालिका आहे. त्यामुळे या मालिकेत काम करायला मिळणं हे प्रचंड मोठं भाग्य आहे असं मला वाटतं. मालिकेची टीम अतिशय भन्नाट आहे. या टीममध्ये मी जरी नवा असलो तरी मला तसं कुणी जाणवू दिलं नाही. खूप प्रेमाने माझं स्वागत झालं. आई कुठे काय करते मालिकेची ही स्वप्नवत टीम आहे. सुजाण कलाकार, उत्कृष्ट संवादलेखन आणि तितक्याच ताकदीचं दिग्दर्शन यामुळे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिकंली आहेत.'

अविनाश या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं तर 15 वर्षांपूर्वी त्याने देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. वैचारिक मतभेदांमुळेच अविनाशने हा निर्णय घेतला. मात्र आता हसतं खेळतं कुटुंब दुभंगणार हे कळल्यावर त्याची पावलं पुन्हा एकदा घराकडे वळली आहेत. या मालिकेच्या निमित्ताने एका छान कलाकृतीचा भाग होण्याची संधी मिळाल्याची भावना शंतनू मोघेने व्यक्त केली.

'आई कुठे काय करते' मालिका सध्या भावनिक वळणावर आहे. अनिरुद्ध अरुंधतीच्या नात्याची वीण उसवल्यामुळे सध्या देशमुख कुटुंबाला मानसिक आधाराची गरज आहे. अविनाश कुटुंबाचा आधार होईल का? त्याच्या येण्याने मालिकेत नेमकं कोणतं वळण येणार हे पुढील भागांमधून स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...