आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोना विषाणू संसर्गामुळे अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरे जावे लागले. पण अभिनेता सुव्रत जोशीनं एक क्रेझी अनुभव घेतला. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचे त्याचे राहिलेले डबिंग त्याने थेट लंडनमध्ये पूर्ण केले. गंमत म्हणजे या डबिंगवेळी दिग्दर्शक शंतनू रोडे 'झूम'द्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे, तर लंडनमधील डबिंग स्टुडिओतील तंत्रज्ञ बांगलादेश आणि पोलंडचे होते. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचे चित्रीकरण लॉकडाऊनपुर्वीच पूर्ण झाले होते. शासनाने अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचे डबिंग पूर्ण झाले. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकल्याने त्याला मुंबईत येऊन डबिंग करणे शक्य नव्हते. अखेर तंत्रज्ञानामुळे या अडचणींवर मार्ग निघाला असे चित्रपटाचे निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी सांगितले.
लंडनमध्ये डबिंग करण्याविषयी सुव्रत म्हणाला, 'माझ्या नाटकाच्या दौऱ्यासाठी मी अमेरिकेला गेलो होतो. पण कोरोना संसर्गामुळे दौरा स्थगित करावा लागल्याने मी लंडनला गेलो. त्यामुळे मला गोष्ट एका पैठणी चित्रपटाचं डबिंग करता येत नव्हते. निर्माते अक्षय बर्दापूरकर यांनी धाडसी निर्णय घेऊन मला लंडनमध्ये डबिंग करायला सांगितले. त्यानुसार लंडनमध्ये एक स्टुडिओ शोधला आणि डबिंग पूर्ण केले. या डबिंगसाठी दिग्दर्शक शंतनू रोडे झूमद्वारे ऑनलाइन उपस्थित असायचे. पण स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता.'
प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स, लेकसाईड प्रोडक्शनने 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.