आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवी मालिका:‘देवा श्री गणेशा’मध्ये अभिनेत्री भाग्यश्री मोटे साकारणार पार्वती,  शिबाप्रिया सेन यांनी डिझाइन केला भाग्यश्रीचा लूक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्टार प्रवाह घेऊन येत आहे 11 भागांची गणपती विशेष भव्यदिव्य मालिका ‘देवा श्री गणेशा’

गणपती बाप्पा म्हणजे आपल्या सर्वांचच आराध्य आणि लाडकं दैवत. बाप्पाच्या आगमनासाठी अवघे काही दिवस उरले असताना स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवानिमित्त प्रेक्षकांसाठी गणपती विशेष भागांची भव्यदिव्य मालिका घेऊन येत आहे. 22 ऑगस्टपासून रात्री साडे आठ वाजता ही मालिका आपल्या भेटीला येईल. कोरोनाच्या या संकटकाळात गणपती उत्सवाला बंधनाची मर्यादा आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी गणेशोत्सवाच्या 11 दिवसांमध्ये ‘देवा श्री गणेशा’ या महामालिकेच्या रुपात गणपती बाप्पालाच आपल्या घरी घेऊन येणार आहे.

बाप्पाच्या या विशेष मालिकेमध्ये माता पार्वतीच्या रुपात दिसेल अभिनेत्री भाग्यश्री मोटे. भाग्यश्रीच्या लूकची ही खास झलक आम्ही घेऊन आलो आहोत. भाग्यश्रीच्या लूकवरुनच मालिकेची भव्यता लक्षात येईल. भाग्यश्रीचा लूक डिझाईन केला आहे शिबाप्रिया सेन यांनी. ‘देवा श्री गणेशा’ मालिकेमधील माता पार्वतीचा लूक समोर आल्यानंतर गणपती बाप्पा कोण साकारणार याची उत्सुकता आहे.

भाग्यश्री मोटे या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना म्हणाली, ‘देवयानी नंतर पुन्हा एकदा स्टार प्रवाहची ‘देवा श्री गणेशा’ ही भव्यदिव्य मालिका साकारायला मिळते आहे याचा प्रचंड आनंद आहे. पार्वतीच्या रुपात जेव्हा मी स्वत:ला पाहिलं तेव्हा मी भारावून गेले होते. या लूकवर बरीच मेहनत घेण्यात आलीय. माता पार्वतीची सौम्यता तिचा हवळेपणा आणि प्रसंगी समोर येणारं रौद्र रुप हे साकारायला मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.’

‘देवा श्री गणेशा’ मालिकेच्या निमित्ताने मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच इतकी बिगबजेट मालिका आकाराला येतेय. महाभारत, राधेकृष्ण यासारख्या भव्यदिव्य मालिका साकारणारे सुप्रसिद्ध निर्माते सिद्धार्थ कुमार तिवारी यांच्या स्वस्तिक प्रोडक्शन्सने ही भव्य मालिका साकारण्याचं आव्हान पेललं आहे. ही महामालिका साकारण्यासाठी स्टार प्रवाह आणि स्वस्तिक प्रोडक्शन्सची संपूर्ण टीम दिवसरात्र मेहनत करते आहे. उमरगाव इथे या मालिकेचा भव्यदिव्य सेट आकाराला येत असून लवकरच शूटिंगचा श्रीगणेशा होणार आहे.

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण कधीही ऐकल्या आणि पाहिल्या नाहीत ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे.

0