आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच 'मन धागा धागा जोडते नवा' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'मुलगी झाली हो' या गाजलेल्या मालिकेत माऊची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या पुगावकर मुख्य भूमिका साकारणार आहे. या नव्या मालिकेत दिव्या आनंदी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका घटस्फोट या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणार आहे. या नव्या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. चाहत्यांसह सेलिब्रिटींनी दिव्याला या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री गौरी कुलकर्णी, अभिनेता सिद्धार्थ खिरीड यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
आनंदी ही व्यक्तिरेखा आव्हानात्मक - दिव्या
इतरांना भरभरुन आनंद देणारी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रचंड उत्सुक आहे. या नव्या भूमिकेविषयी सांगताना दिव्या म्हणाली, "स्टार प्रवाह वाहिनीसोबत माझ्या आयुष्यातली मी पहिली मालिका केली होती. पुन्हा एकदा या वाहिनीसोबत काम करताना आनंद होतोय. मुलगी झाली हो मालिकेत न बोलता खूप काही व्यक्त करण्याचं आव्हान होतं. या मालिकेत मी बोलणार तर आहे पण मनात खूप साऱ्या भावना साचवून. त्यामुळे आनंदी ही व्यक्तिरेखा एक अभिनेत्री म्हणून जास्त आव्हानात्मक आहे."
पुढे दिव्या म्हणाली, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या अभिनेत्याला स्क्रीनवर पहात आलेय त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं हे स्वप्नवत आहे. हा अभिनेता नेमका कोण आहे हे कळेलच. पण या मालिकेच्या रुपात नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आनंदी साकारण्यासाठी सध्या मी माझ्या भाषेवर आणि आवाजावर काम करतेय. माऊ या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं आहे. हेच प्रेम आनंदीलाही मिळेल याची खात्री आहे," असे ती म्हणाली.
या मालिकेत दिव्यासोबत कोणता अभिनेता मुख्य भूमिकेत झळकणार याची उत्सुकता आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका येत्या 8 मे पासून सायंकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.