आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तिसरी पुण्यतिथी:...म्हणून रिमा लागू यांनी सोडली होती बँकेतली नोकरी, 'या' गोष्टीची आयुष्यभर वाटली होती त्यांना खंत 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आजही त्या त्यांच्या विविधांगी भूमिकांच्या माध्यमातून आपल्यातच आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांना या जगाचा निरोप घेऊन तीन वर्षे लोटली आहेत. 18 मे 2017 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले होते. निधनाच्या काही तासांपूर्वी पर्यंत त्या शूटिंग करत होत्या. त्यावेळी त्या नामकरण या मालिकेत नकारात्मक भूमिका साकारत होत्या. शूटिंगहून परत आल्यानंतर त्यांना छातीत दुखू लागले होते. म्हणून त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.

बाल कलाकार म्हणून सुरू झालेली रिमा लागू यांची अभिनय क्षेत्रातील कारकिर्द 50 वर्षांहून अधिक मोठी आहे. यामध्ये नाटकापासून सुरू झालेल्या त्यांचा प्रवास हिंदी, मराठी चित्रपट आणि टिव्ही मालिकांद्वारे अगदी घराघरापर्यंत पोहोचला. बॉलिवूडमध्ये आईची भूमिका रंगवणाऱ्या मोजक्या अशा आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये रिमा लागू यांचे नाव घेतले जाते. रिमा लागू यांचा अभिनय क्षेत्रातील 50 वर्षांता प्रवास हा अगदी थक्क करणारा असा आहे. मराठीसह हिंदी इंडस्ट्रीमध्येही मोठे नाव कमावल्यानंतरही रिमा लागू या शक्यतो लाईमलाइटपासून दूर राहणे पसंत करायच्या.  

रिमा लागू यांचे मूळ नाव नयन भडभडे असे होते. पुण्यातील हुजूरपागा शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले. दुर्गा खोटे यांची रिमा लागू यांच्या आईशी ओळख होती. त्यांनी सांगितल्यामुळे रिमा लागू यांच्या आईने रिमा यांनी चित्रपटात काम करण्यास सांगितले. रिमा लागू यांनी त्यावेळी दुर्गा खोटे यांच्याबरोबर मिरी आणि मास्टरजी हे दोन बालचित्रपट केले. तेव्हापासून रिमा यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर रिमा यांनी बाल कलाकार म्हणून 10 ते 12 चित्रपट केले होते.

पाचवीपासून रिमा लागू यांच्या आईने त्यांना अभ्यासाकडे लक्ष देता यावे म्हणून अभिनय पूर्ण बंद केला आणि अकरावीपर्यंत त्या रुपेरी पडद्यापासून दूर गेल्या. अकरावीनंतर मुंबईत आल्यानंतर त्यांची सुरुवात झाली. मुंबईत आल्यानंतर रिमा लागू यांच्या कारकिर्दीला चांगली सुरुवात झाली. विल्सन कॉलेजला त्यांनी प्रवेश घेतला होता. पण आल्या आल्या त्यांना फुलराणी हे नाटक मिळाले. त्यामुळे कॉलेजला त्यांचे फारसे जाणे होत नसायचे. त्यानंतर रिमा यांना श्याम बेनेगल यांच्याकडून एका जाहिरातीत संधी मिळाली. एकूण सात भाषांमध्ये असलेली ही साबणाची जाहिरात म्हणजे रिमा लागू यांची पहिली जाहिरात होती. यापैकी दक्षिण भाषेतील जाहिराती करताना भाषेमुळे त्यांची फजिती झाली होती. हे सर्व काम सुरू झाल्याने रिमा यांनी कॉलेजमधून अक्षरशः आराम घेतला आणि कॉलेज झेपत नसल्याचे आईला स्पष्ट सांगितले. त्यानंतर कॉरस्पाँडन्स कोर्सद्वारे तीन चार वर्षांनी रिमा यांनी बीए पूर्ण केले.

एकाच वेळी नोकरी, घर सांभाळणे आणि नाटक किंवा चित्रपट यात काम करणे अशी रिमा लागूंची तारेवरची कसरत चाललेली होती. त्या बँकेत नोकरीला होत्या. पण मुलगी झाल्यानंतर तिला सोडून बँकेत कामाला जाणे त्यांना कठीण जाऊ लागले. त्याचा मानसिक त्रास रिमा यांना व्हायचा. त्यामुळे त्यांनी आधी बँकेची नोकरी सोडली. त्यानंतर मुलगी जवळपास दोन वर्षांची झाल्यानंतर रिमा लागू अभिनयाकडे वळल्या आणि त्यावेळी आता हेच आपले करिअर असे त्यांचे ठरले.

रिमा लागू यांचे वैवाहिक आयुष्य तसे लवकर सुरू झाले. मूळच्या नयन भडभडे असलेल्या रिमा लागू यांची बँकेत नोकरी करताना विवेक लागू यांच्याशी भेट झाली. नाटकांतून काम करतानाच त्या विवेक यांनी भेटल्या होत्या. त्याकाळी अॅक्टींगची आवड असेल तर नाटकातील काम करणाऱ्या कलाकारांना बँकेत नोकरी मिळायची. त्यातूनच विवेक यांची भेट झाली. त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता.

पती आणि मुलीसोबत रिमा लागू
पती आणि मुलीसोबत रिमा लागू

पुरुष बरोबरच सविता दामोदर परांजपे आणि घर तिघांचं हवं ही नाटके त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची असल्याचे रिमा लागू कायम म्हणायच्या. चित्रपटांमध्ये हव्या तशा भूमिका फार कमी लाभल्याची खंत रिमा लागू यांना कायम होती. 'वास्तव' चित्रपटातील आई ही आव्हानात्मक भूमिका होती तशा भूमिका करण्याची रिमा यांची मनापासून इच्छा होती. पण त्यांना कायम एकाच पठडीतीस आईच्या भूमिका मिळाल्याने त्यांना वाईट वाटायचे. त्याचवेळी सूरज बडजात्यांच्या चित्रपटातील आईचा बाज वेगळा असायचा त्यामुळे त्या भूमिकांचा अनुभव अधिक वेगळा होता, असेही त्या म्हणायच्या.

हिंदी, मराठी चित्रपट, नाटक तसेच टेलिव्हिजन मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ही त्यांची नाटकं विशेष गाजली होती.  टीव्हीवरील 'तू तू मैं मैं' आणि 'श्रीमान श्रीमती' या विनोदी मालिकांनी त्यांना घराघरात पोहोचवले.  

रिमाताईंनी बऱ्याच चित्रपटांमध्ये सलमान खान, काजोल, जुही चावला आणि माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका साकारली होती. ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘हम साथ साथ है’, ‘वास्तव’, ‘साजन’, ‘कुछ कुछ होता है’, ‘आशिकी’, ‘आई शप्पथ’, ‘बिनधास्त;, ‘जाऊ द्या ना बाळासाहेब’, ‘सातच्या आत घरात’, ‘मुक्ता’, यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांना ‘मैने प्यार किया’ (1990), ‘आशिकी’ (1991), ‘हम आपके है कौन’ (1995) आणि ‘वास्तव’ (2000) या चित्रपटांतील भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर’ पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...