आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज 8 मार्च जागतिक महिला दिन. या खास दिनाचे औचित्य साधत अभिनेत्री श्वेता शिंदे, प्रिया मराठे आणि प्रतिक्षा जाधव यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.
अभिनेत्री श्वेता शिंदे (मालिका - डॉक्टर डॉन)
माझ्यासाठी रोजच महिला दिवस आहे. महिला संसाराची गाडी अगदी हसतमुखाने पुढे नेत असतात त्यामुळे रोजचा दिवस हा त्यांचाच असतो असं मी म्हणेन. माझी आई माझं इन्स्पिरेशन आहे. तिला बघून मला काही तरी चांगलं करण्याची प्रेरणा सतत मिळत असते.
डॉक्टर डॉन या मालिकेत मी डॉक्टर आणि कॉलेजच्या डीनची भूमिका निभावतेय. पण खऱ्या आयुष्यातील डॉक्टरची भूमिका ही किती आव्हानात्मक आहे हे आपण कोव्हिडच्या काळात बघितलं आणि अजूनही बघतोय. त्यांचं योगदान हे वेगळं सांगायची गरज नाही. ते आपलं घरदार विसरून रुग्णांच्या सेवेत अजूनही तत्पर आहेत. ते डॉक्टर नसून देव म्हणूनच सगळ्यांच्या पाठीशी उभे राहिले. त्यात अनेक महिला डॉक्टर्स आणि परिचारिका यांचा समावेश होता. त्यामुळे मी म्हणेन की त्या सर्वांकडूनच मला खूप प्रेरणा मिळाली. मी ऑन-स्क्रीन का होईना एका डॉक्टरची भूमिका निभावतेय याचा मला आनंद आहे. सगळ्या महिलांना माझ्या कडून महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
अभिनेत्री प्रिया मराठे (मालिका - ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण)
आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेत. अगदी देशाचं वित्त संभाळण्यापासून ते सीमेवर लढण्यापर्यंत आणि घरातील सर्व कामं करण्यापर्यंत स्त्रिया प्रत्येक ठिकाणी आपलं कौशल्य दाखवत आहेत. त्यामुळे स्त्रीचं स्त्रीत्व साजरं करण्यासाठी एकच दिवस पुरेसा आहे असं मला नाही वाटत. आपण हे स्त्रीत्व जपलं पाहिजे, ते रोज साजरं केलं पाहिजे आणि त्याचा अभिमान बाळगला पाहिजे.
मी ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण या मालिकेत एका आईची भूमिका साकारतेय. आई ही सगळ्यांच्याच आयुष्यातील महत्वाची स्त्री असते. तिची भूमिका अजिबातच सोपी नसते. आई ही पुढच्या पिढीला घडवत असते, त्यांना संस्कार देत असते, उत्तम माणूस कसं बनता येईल याची शिकवण देत असते त्यामुळे आई असणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. सगळ्या आई ही भूमिका उत्तम प्रकारे साकारत आहेत त्यामुळे त्यांना काही संदेश देण्यासाठी मी खूप लहान आहे पण त्यांना मी त्रिवार अभिवादन करेन. माझ्या स्ट्रेंथ बद्दल सांगायचं झालं, तर माझी निर्णय घेण्याची क्षमता खूप चांगली आहे. एखाद्या परिस्थितीत मी पटकन प्रतिक्रिया न देता संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन प्रतिक्रिया देते. माझे पती आणि माझं कुटुंब ही माझी सगळ्यात मोठी ताकद आहे. सगळ्या महिलांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांच्या सगळ्या इच्छा आणि स्वप्न पूर्ण होवोत अशी मी प्रार्थना करते.
अभिनेत्री प्रतिक्षा जाधव (मालिका - तुझं माझं जमतंय)
स्त्रीत्व इतकं महान आहे की ते साजरं करण्यासाठी फक्त एक दिवस असणं हे खूप केविलवाणं आहे. स्त्रीचा आणि स्त्रीत्वाचा आदर करणं जेव्हा सगळ्यांना जमेल तोच दिवस खरा सोन्याचा दिवस असेल आणि खऱ्या अर्थाने महिला दिवस असेल. मी स्वतः एक खेळाडू आहे. मी जुडो कराटेच प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यामुळे महिला दिनानिमित्त मी आजूबाजूच्या शाळांमधल्या मुलींना एकत्र करून त्यांना आत्मविश्वास जागृती आणि जमेल तशा प्रकारे त्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करते. माझी सगळ्यात मोठी स्ट्रेंथ ही माझी आई आहे, माझा निडरपणा आणि माझा आत्मविश्वास आहे. तेजस्विनी नावाची माझी एक संस्था आहे ज्यात अनेक महिला आहेत तसेच एक महिला बचत गट पण आहे. त्यांच्यासाठी आम्ही महिला दिनानिमित्त काही सेशन्स ठेवतो जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल किंवा त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्सना कसं तोंड द्यायचं हे त्यातून कळेल. स्त्रीने प्रत्येक दिवस हा साजरा करावा.
मी सध्या तुझं माझं जमतंय या मालिकेत पम्मीची भूमिका साकारतेय. या मालिकेसाठी आम्ही नगरमध्ये शूट करतोय. कधी कधी पॅकअप उशिरा झालं की आम्हाला घरी जायला उशीर होतो. मी स्वतः ड्राइव्ह करून जाते. अशावेळी मला माझा निडरपणा कामी येतो. महिलांमध्ये खूप शक्ती आहे फक्त त्यांनी स्वतःची ताकद ओळखली पाहिजे. सगळ्या महिलांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.