आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

शुटिंग अपडेट:अभिनेत्री श्वेता शिंदे म्हणाली - 'न्यू नॉर्मल स्वीकारायला थोडा वेळ लागला पण आता सगळ्याची हळूहळू सवय करुन घेतेय'  

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'डॉक्टर डॉन' या मालिकेचे चित्रीकरण सध्या एका रिसॉर्टमध्ये सुरु आहे.

छोट्या पडद्यावरील 'डॉक्टर डॉन' या मालिकेच्या सेटवर आता लगबग दिसू लागली आहे. मालिकेचे चित्रीकरण पुन्हा सुरु झाले आहे. 13 जुलै पासून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. कोरोनाच्या संकटाचा विचार करता, योग्य ती सर्व खबरदारी घेऊन चित्रीकरण केले जात आहे.

सेटवर नेमके वातावरण कसे आहे, आणि आपली लाडकी अभिनेत्री श्वेता शिंदे कशाप्रकारे काळजी घेत आहे, याविषयी बोलताना श्वेता म्हणाली, "मीरारोड, ही अत्यंत गजबजलेली जागा आहे. या 'रेड झोन'मध्ये चित्रीकरण न करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या मालिकेचे चित्रीकरण एका रिसॉर्टमध्ये सुरु आहे. मालिकेतील कलाकार व संपूर्ण टीम तिथेच राहते. कुणालाही बाहेरून आत येण्याची, अथवा बाहेर कुठेही जाण्याची परवानगी देण्यात येत नाही. आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याचा विचार करून, सेटवरील प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने वागत आहे. मी सातत्याने थर्मास सोबत ठेवते. गरम पाणी पीत राहणं, वेळोवेळी सी व्हिटॅमिनच्या गोळ्या घेणं, सुरु आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढेल यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी मी करते आहे.'

श्वेता पुढे म्हणाली, 'चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आहार, नियमित व्यायाम या गोष्टी सुरु आहेत. माझा मेकअप मी स्वतःचा स्वतः करते आहे. माझी केशभूषा होण्याआधी त्यासाठी लागणार असलेली सर्व उपकरणं व्यवस्थित निर्जंतुक करण्यात येतात. मालिकेतील पोषाखासाठी वापरण्यात येणारे कपडे सुद्धा योग्यरीतीने निर्जंतुक करून मगच मी वापरते. या सर्व छोट्या गोष्टींची सवय नसल्यामुळे, सुरुवातीच्या काळात सगळंच थोडं कठीण वाटत आहे. मात्र या सगळ्याची सवय आम्ही हळूहळू करून घेत आहोत."

0