आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षा उसगांवकरांचा माफीनामा:म्हणाल्या - कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची मी हात जोडून माफी मागते; कोळी महिलांचा केला होता अवमान

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोळी समाजाचा अवमान केल्याप्रकरणी मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एका जाहिरातीत त्यांनी कोळी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते, त्यामुळे कोळी समाजाने त्यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. आता वर्षा उसगांवकर यांनी कोळी समाजाची हात जोडून माफी मागितली आहे. याबाबतचा व्हिडिओ जाहिरात प्रसिद्ध करणा-या अ‍ॅपने शेअर केला आहे. याद्वारे त्यांनी या वादावर पडदा टाकला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

काय म्हणाल्या वर्षा उसगांवकर
व्हिडिओत हात जोडून वर्षा उसगांवकर म्हणत आहेत, "नमस्कार मी वर्षा उसगांवकर, यामिली या अ‍ॅपबद्दल बोलताना जर माझ्याकडून कोळी समाजाच्या काही भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्यांची हात जोडून माफी मागते. त्यांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. त्याउलट कोळी समाजाबद्दल मला नितांत आदर आहे. त्यामुळे कोळी समाजाच्या बंधू-भगिनींची मी पुन्हा एकदा हात जोडून माफी मागते. धन्यवाद”, असे त्यांनी या व्हिडिओत म्हटले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मासे विक्रेत्या अ‍ॅपने एक जाहिरात प्रसारित केली होती. या अ‍ॅपचे प्रमोशन वर्षा उसगांवकर यांनी केले. वर्षा उसगावकर या जाहिरातीत असून 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' असे विधान उसगावकर यांनी या जाहिरातीत केले असून त्यावरून मच्छिमारांनी संताप व्यक्त केला. ही जाहिरात फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी दुपारनंतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली.

जाहिरातीत नेमके काय आहे?
'मला मासे खायला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत. बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अ‍ॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले.' असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.

...तर त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील
या जाहिरातीवर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला. उसगावकर यांचे हे वादग्रस्त वक्तव्य अतिशय निंदनीय असून दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे रान करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. कष्टकरी महिलांचा मराठी सिनेसृष्टीतील महिला कलाकारांकडून असा अवमान होणे हे दुर्दैव आहे. यातून गरिबांच्या प्रति असलेली त्यांची मानसिकता प्रखरपणे दिसत आहे. उसगांवकार यांनी याबाबत मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी दिला होता.

बातम्या आणखी आहेत...