आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहिरातीतून वर्षा उसगांवकरांनी केला कोळी भगिनींचा अपमान:अभिनेत्रीला इशारा- शूटिंगवर जाऊन खाऊ घालू सडलेले मासे!

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जाहिरातींमुळे अनेक सेलिब्रिटी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता या यादीत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. एका अ‍ॅपची जाहिरात करताना त्यांनी कोळी महिलांचा अपमान केल्याचे वृत्त आहे. उसगांवकार यांनी मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील, असा इशारा त्यांना देण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
मासे विक्रेत्या अ‍ॅपने एक जाहिरात केली आहे. या अ‍ॅपचे प्रमोशन वर्षा उसगांवकर यांनी केले आहे. अभिनेत्री वर्षा उसगावकर या जाहिरातीत असून 'बाजारात बऱ्याच वेळा कोळणींकडून माझी फसवणूक झाली आहे. बाजारातल्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की, त्यावेळी मी हे पापलेट का घेतले, असे वाटून निराश झाले' असे विधान उसगावकर यांनी या जाहिरातीत केले असून त्यावरून मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. ही जाहिरात फेसबुकवर प्रसिद्ध करण्यात आली होती. दरम्यान, सोमवारी दुपारनंतर ही जाहिरात फेसबुकवरून काढून टाकण्यात आली.

जाहिरातीत नेमके काय आहे?
'मला मासे खायला आवडतात. ते ताजे आहेत की नाही याची चव मला लगेच समजते पण बाजारात मासे घ्यायला जाते तेव्हा ते मासे ताजे आहेत की नाही हे त्यावेळी कळत नसल्याने माशांची निवड करता येत नाही. त्यामुळे बाजारात जाते तेव्हा बऱ्याच वेळा माझी कोळणींकडून फसवणूक झालेली आहे. विशेषतः पापलेटच्या बाबतीत. बाजारात ते पापलेट खूप ताजे आहेत, असे वाटतात. घरी आल्यानंतर त्या पापलेटला इतका घाणेरडा वास येतो की त्यावेळी मी हे पापलेट का घेतले असे वाटून निराश झाले. त्यावेळी हे खासगी अ‍ॅप माझ्या आयुष्यात वरदान स्वरूपात आले.' असे उसगावकर यांनी या जाहिरातीत म्हटले आहे.

...तर त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील
या जाहिरातीवर मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. उसगावकर यांचे हे वादग्रस्त वक्तव्य अतिशय निंदनीय असून दोन वेळेच्या जेवणासाठी जीवाचे रान करणाऱ्या मासे विक्रेत्या कोळी महिलांचा हा अपमान आहे. कष्टकरी महिलांचा मराठी सिनेसृष्टीतील महिला कलाकारांकडून असा अवमान होणे हे दुर्दैव आहे. यातून गरिबांच्या प्रति असलेली त्यांची मानसिकता प्रखरपणे दिसत आहे. उसगावकार यांनी याबाबत मासे विक्रेत्या कोळी महिलांची जाहीर माफी न मागितल्यास त्यांच्या शूटिंगच्या सेटवर जाऊन त्यांना सडलेले मासे खाऊ घालण्यात येतील, असा इशारा अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीच्या महिला अध्यक्ष नयना पाटील यांनी दिला आहे.

अ‍ॅपवाले कोणत्या बोटीने मासेमारी करतात...
कोळणींचे पती स्वतः मच्छीमार असताना त्या खराब मासळी का विकतील असा सवाल करत ऑनलाइन ॲपवाले कोणत्या बोटीने मासेमारी करतात, असा प्रश्न कोळी महिलांकडून करण्यात आला आहे.

कोळी महिलांची माफी मागावी
ज्या ऑनलाइन अ‍ॅपने ही जाहिरात प्रदर्शित केली आहे त्यांनी कोळी महिलांची माफी मागावी अन्यथा त्यांना कायदेशीर नोटीस बजावली जाईल. तसेच ही जाहिरात सर्व माध्यमातून काढण्यात यावी, तसे न केल्यास संबंधित कंपनीच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार असल्याचे माहिती समितीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. कमलाकर कांदेकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...