आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटा पडदा:‘देवा श्री गणेशा’ मालिकेतील गणपती बाप्पाची खास झलक, हा अभिनेता साकारतोय बाप्पाची भूमिका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेच्या निमित्ताने सेटवर मोदकांची मेजवानी दररोज असते.

स्टार प्रवाह वाहिनीवर गणेश चतुर्थीपासून म्हणजेच 22 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या ‘देवा श्री गणेशा’ या गणपती विशेष मालिकेची कमालीची उत्सुकता आहे. गणपती बाप्पाच्या जन्मापासून ते लग्नापर्यंतच्या अलौकिक गोष्टी या मालिकेच्या निमित्ताने उलगडणार आहेत. या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका अद्वैत कुलकर्णी साकारणार आहे. गणपती बाप्पाची भूमिका साकारायला मिळावी ही त्याची लहानपणापासूनची इच्छा होती आणि या मालिकेच्या निमित्ताने अद्वैतचं हे स्वप्न पूर्ण होत आहे. गणपती बाप्पाप्रमाणेच अद्वैतला मोदक खायला खूप आवडतात. ‘देवा श्री गणेशा’ या मालिकेच्या निमित्ताने सेटवर मोदकांची मेजवानी दररोज असते. सेटवर संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूट करतो. सुरुवातीला बाप्पाच्या रुपात तयार होण्यासाठी 2 तास लागायचे मात्र आता तासाभरात आमची टीम मला तयार करते असं अद्वैतने सांगितलं.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दैनंदिन मालिकांच्या गर्दीत स्टार प्रवाह फक्त 11 विशेष भागांची मालिका घेऊन येत आहे. रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या 11 दिवसांत 1 1 सशक्त आणि विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतील. या भव्य मालिकेतून संस्कार घडवणाऱ्या छान गोष्टी भव्य स्वरुपात पहायला मिळणार आहेत.’

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण ऐकल्या आहेत पण त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहित नाही. ‘देवा श्री गणेशा’ या 11 भागांच्या विशेष मालिकेतून 11 ऐकलेल्या मात्र त्याविषयी फारशी माहिती नसलेल्या बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...