आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अक्षर कोठारीचं दमदार पुनरागमन:दोन वर्षांच्या ब्रेकनंतर ‘स्वाभिमान’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अक्षर, साकारतोय 'ही' भूमिका

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री शाल्मली टोळ्येने अक्षरचा मालिकेतील लूक डिझाईन केला आहे.

अभिनेता अक्षर कोठारी टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्टार प्रवाहवर 22 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ‘स्वाभिमान’ या मालिकेतून तो नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्वाभिमान मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, ‘दोन वर्षांनंतर मी छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. स्टार प्रवाहसोबतची ही चौथी मालिका करताना अतिशय आनंद होत आहे. बंध रेशमाचे, आराधना, छोटी मालकीण आणि आता स्वाभिमान. या मालिकेतला लूकही अतिशय वेगळा आहे. छोटी मालकीण मालिकेत प्रेक्षकांनी पिळदार मिश्या असलेल्या रांडग्या श्रीधरच्या रुपात मला पाहिलं होतं. मात्र स्वाभिमान मालिकेत माझा लूक पूर्णपणे वेगळा असणार आहे. अभिनेत्री आणि आता वेशभूषाकार अशी ओळख निर्माण केलेल्या शाल्मली टोळ्येने माझा लूक डिझाईन केला आहे. ​​​​​'

भूमिकेविषयी सांगताना अक्षर म्हणाला, 'शांतनू सुर्यवंशी असं माझ्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. सुर्यवंशी कुटुंब शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांची बरीचशी महाविद्यालय आहेत. अशा या कुटुंबात वाढलेला शांतनू सुशिक्षित, सुसंस्कृत, अतिशय हुशार आणि आत्मविश्वासू असा मुलगा आहे. मी पहिल्यांदाच अशा पद्धतीचं कॅरेक्टर साकारणार आहे आणि याचा मला अतिशय आनंद होत आहे. शांतनूची स्टाईल आणि त्याचा अटिट्यूड कॅरी करणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे.’

'स्वाभिमान' या नावाप्रमाणेच अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या स्वाभिमानी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कशा पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट स्वाभिमान मालिकेतून उलगडेल. पूजा बिरारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित अशी दमदार कलाकारांची फौज मालिकेत पाहायला मिळेल.