आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोट्या पडद्यावरील नवी जोडी:‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतून क्षया हिंदळकर आणि संचित चौधरीची नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला, दिसणार हटके केमिस्ट्री

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 21 डिसेंबरपासून ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

स्टार प्रवाहवर नव्याने दाखल होत असलेल्या ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या मालिकेच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. या मालिकेच्या निमित्ताने अक्षया हिंदळकर आणि संचित चौधरी ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अक्षयाने याआधी स्टार प्रवाहच्याच 'कुलस्वामिनी' आणि 'साता जल्माच्या गाठी' या दोन मालिकांमध्ये लक्षवेधी भूमिका साकारली होती. तर संचितने स्टार प्रवाहच्या 'प्रेमाचा गेम सेम टु सेम' या मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारली होती. ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ मालिकेतील ही नवी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी दोघंही प्रचंड उत्सुक आहेत.

या मालिकेतील व्यक्तिरेखेविषयी सांगताना अक्षया म्हणाली, ‘मी या मालिकेत स्वाती ही व्यक्तिरेखा साकारते आहे. स्वाती कष्टाळू मुलगी आहे. साधा-सरळ, मनमिळाऊ, नम्र, सगळ्यांशी प्रेमाने वागणारा आणि नऊ ते पाच नोकरी करणारा नवरा हवा अशी तिची इच्छा असते. मात्र स्वातीवर जीवापाड प्रेम करणारा रघू मात्र याच्या परस्पर विरोधी स्वभावाचा. रघू फक्त एकदाच सांगतो नाहीतर सरळ उलटा टांगतो हे ब्रीदवाक्य घेऊन मनमौजी जगणारा. असे हे दोन विरुद्ध स्वभावाचे स्वाती आणि रघू एकमेकांच्या प्रेमात पडणार का? याची गोष्ट म्हणजे तुझ्या इश्काचा नादखुळा ही नवी मालिका. या मालिकेच्या निमित्ताने संचित आणि मी पहिल्यांदाच काम करत आहोत. मी थोडी अबोल असल्यामुळे शूटिंगच्या पहिल्या दिवशी संचित सोबत काम करताना आमचं फारसं बोलणं झालं नाही. मात्र आता आमची खूप छान मैत्री झाली आहे. या मालिकेच्या निमित्ताने संचितच्या रुपात मला एक चांगला मित्र भेटलाय.’

संचित चौधरी त्याच्या भूमिकेविषयी सांगताना म्हणाला, ‘नवी मालिका आणि नवं पात्र साकारताना खूप आनंद होतो आहे. मालिकेची गोष्ट आणि प्रत्येक पात्र प्रेमात पडायला लावेल असंच आहे. रघू मनमौजी जगणारा असला तरी स्वातीवर जीवापाड प्रेम करतो. रघू त्याच्या प्रेमात यशस्वी होणार का हे मालिकेतून हळुहळु उलगडेलच. पण माझा हा नवा अंदाज प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे. स्वाती आणि रघूची खूप छान केमिस्ट्री प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्ताने पहायला मिळेल.’

बातम्या आणखी आहेत...