आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविनोदाचे बादशाह अशोक सराफ यांचा आज वाढदिवस असून त्यांन वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. इंडस्ट्रीत अशोक सराफ यांना अशोक मामा म्हणून ओळखले जाते. पण त्यांच्या अशोक या नावामागे एक रंजक कहाणी आहे. त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी स्वतः दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या नावामागील कहाणी चाहत्यांना सांगितली होती. त्याचसोबत निवेदिता यांनी एक फोटोसुद्धा पोस्ट केला होता. या फोटोमध्ये अभिनेते अशोक कुमार यांच्यासोबत अशोक सराफ पाहायला मिळत आहेत.
अशोक कुमार यांच्यासोबतचा अशोक सराफ यांचा फोटो शेअर करत निवेदिता यांनी गुरु शिष्य... असे कॅप्शन त्याला दिले होते. यासोबतच त्या म्हणाल्या होत्या, "अशोक सराफ यांची मोठी बहीण विजया ही अशोक कुमारांची खूप मोठी चाहती. त्यांच्या अभिनयाने ती खूप भारावून गेली होती. धाकट्या भावाचा जन्म झाला तेव्हा तिने हट्टाने त्याचे नाव अशोककुमार ठेवायला आईला भाग पाडले. ईश्वरानेही तथास्तु म्हटले. अशोककुमार सराफचाच पुढे झाला अशोक सराफ."
अशाप्रकारे अशोककुमार यांच्या नावावरुनच अशोक सराफ यांचे नाव ठेवण्यात आले होते. चतुरस्त्र अभिनेता आजही तितक्याच ताकदीने, उत्साहाने ठामपणे उभा आहे आणि अशोककुमारांना गुरुस्थानी मानतो आहे, असे निवेदिता यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.
अशोक सराफ यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रंगभूमीवरसुद्धा ते रमतात. अलीकडेच ते पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत ‘प्रवास’ या चित्रपटात झळकले होते. तर लवकरच ते रितेश देशमुख दिग्दर्शित वेड या चित्रपटात एका महत्त्वपूर्ण भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात त्यांच्यासोबत जिनिलिया देशमुखही झळकणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.