आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ 4 जून रोजी 75 वर्षांचे होत आहेत, त्यांचा आगामी चित्रपट 'वेड' आता 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे त्या निमित्ताने अशोक सराफ यांच्याशी संवाद साधला .
वयाच्या पंचाहत्तरीतसुद्धा त्यांचा उत्साह अफाट आहे. 'वेड' चित्रपटासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिली. अशोक सराफ म्हणाले, "जेव्हा मला कळालं 'वेड' चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख करत आहेत तेव्हा कोणता ही पुढचा मागचा विचार न करता मी होकार दिला, कारण माझ्या दृष्टीने हे महत्वाचे होते की तो दिग्दर्शक बनतोय . रितेश एक टॅलेंटेड आर्टिस्ट आहेच त्यामुळे तो दिग्दर्शन करत असतांना मला देखील काही नवीन शिकता येईल हा माझा हेतू होता आणि खरं सांगतो या चित्रपटाचे शूटिंग मी इतका एन्जॉय केलं, धम्माल मजा केली."
अशोक सराफ पुढे सांगतात, "रितेश हा अतिशय थंड डोक्याने सेट वर काम करत होता कुठे ही त्याने एक्साइटमेंट दाखवली नाही. प्रत्येक सीनवर विचारपूर्वक काम रितेशने केले आहे. असे थंड डोक्याने काम करणारे फार कमी दिग्दर्शक आहेत आणि मला वाटतं रितेशच्या रूपाने आपल्याला नवीन दिग्दर्शक मिळाला आहे. 'वेड' हा चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे यात काहीच शंका नाही."
पुढे अशोक सराफ म्हणाले, "आणखी एक बाब म्हणजे या चित्रपटाद्वारे रितेशची पत्नी जिनिलिया मराठीतून पदार्पण करत आहे. तिने पण मराठी समजून घेऊन उत्तम काम केले आहे. या सर्व अनुभवातून एकच सांगावेसे वाटते की, माझ्या आयुष्यात एक चांगला चित्रपट केल्याचा फील मला आला. या चित्रपटाच्या निमित्ताने रितेश म्हणून मला एक चांगला मित्र भेटला असं मी म्हणेल."
मामांसोबत काम करणे स्वप्नवत - रितेश देशमुख
रितेश देशमुखने त्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणतो, "गेल्या 20 वर्षांपासून मी सिनेसृष्टीत काम करतोय आणि अशोक मामांसोबत काम करण्याची संधी मला कधीच मिळाली नव्हती. जेव्हा 'वेड' चित्रपटाच्या लेखनाचे काम सुरु होते तेव्हा कुठे तरी वाटत होते या चित्रपटात अशोक मामांची भूमिका असावी म्हणजे जेणेकरून अशोक मामांसोबत काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण होईल. मी पहिला चित्रपट दिग्दर्शित करतोय आणि त्यात अशोक मामा आहेत हे सर्व स्वप्नवत आहे."
तो सांगतो, "अशोक मामांना सोबत काम करण्याचा अनुभव विलक्षण होता, मुळात त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्यामुळे एखादा विनोदी सीन करतांना त्यांनी आपल्या अनुभवातून त्यात आवश्यक ते बदल करून त्यात जान आणत. एका दिग्दर्शकाला आपला लाडका अभिनेता आपण लिहून दिलेल्या सीनपेक्षा खूप काही आपल्या अभिनय कौशल्यातून देतो तेव्हा आणखी काय हवंय... आज अशोक मामांचा 75 वा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने मी त्यांना खूप खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो ही प्रार्थना करतो."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.