आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'त्या' वाड्यातील रहस्य आता उलगडणार !:राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 'अथांग'चा ट्रेलर रिलीज, तेजस्विनी पंडीतचे निर्मितीत पाऊल

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भयावह वाडा… वाड्याबाहेर तुळशी वृंदावन… झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या… आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक अळवत…. विचारात पडलात ना, हा कोणता देखावा? तर हा थरारक देखावा उभारण्यात आला होता, ‘अथांग’च्या भव्यदिव्य ट्रेलर लाँचसाठी. जयंत पवार दिग्दर्शित ‘अथांग’ या वेबसीरिजचा ट्रेलर लाँच सोहळा नुकताच दणक्यात पार पडला.

या सोहळ्याला सर्व कलाकारांनी पारंपरिक पेहरावातून १८००चा काळ पुन्हा एकदा उभा केला. हा दिमाखदार सोहळा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या सोहळ्याला ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ, दिग्दर्शक अभिजीत पानसे, सिद्धार्थ जाधव, सायली संजीव, श्रेया बुगडे यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.

ट्रेलरमध्ये निसर्गयरम्य कोकण, तिथला रहस्यमय वाडा आणि त्या वाड्यात दडलेली अनेक गुपितं आणि यात आणखी उत्कंठा वाढवणारा शेवटचा प्रश्न. ट्रेलरच्या शेवटी एक लहान मुलगा, ''आई अळवत म्हणजे काय?" असा प्रश्न विचारतो. आता सरदेशमुखांच्या कुटुंबाचा आणि त्या अळवतीचा काय संबंध, हे 'अथांग' पाहिल्यावरच उलगडेल. थरार, रहस्याने भरलेली ही सहा भागांची वेबसीरिज येत्या 25 नोव्हेंबर रोजी प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

बघा ट्रेलर...

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, ''या वेब सिरीजच्या माध्यमातून मी निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. कलाकार ते निर्माती हा प्रवास खूपच रंजक होता. कलाकार म्हणून वावरताना फारशी जबाबदारी नसते परंतु निर्माती म्हणून काम करताना कागदावर श्रीगणेशा लिहिण्यापासून ते अगदी आपले काम प्रदर्शित होईपर्यंत किंबहुना त्यानंतरही जबाबदारी असते. आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे. निर्माती होणे माझ्यासाठी स्वप्न होते आणि ते आज ‘अथांग’च्या निमित्ताने पूर्ण होतेय.’’

प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित या वेब सिरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत ‘अथांग’चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर हे निर्माते आहेत.

बातम्या आणखी आहेत...