आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्लॅनेट मराठी ओटीटीवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' या वेब सिरीजला प्रेक्षकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मराठी वेब सिरीजच्या इतिहासात पहिल्याच दिवशी सर्वात जास्त बघितली जाणारी ही पहिली वेब सिरीज ठरली आहे. या रहस्यमय वाड्यात अनेक गुपिते दडलेली असून एक एक करून ती समोर येत आहेत. आता ही वेब सिरीज एका अशा वळणावर आली आहे, जिथे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता या वेब सिरीजमधील एक प्रेमगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
‘खुलते इथे कळी’ असे या सुमधूर गाण्याचे बोल असून हे गाणे शरयू दाते आणि रोहित राऊत यांनी गायले आहे. गुरू ठाकूर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला रोहित राऊत याचे संगीत लाभले आहे. या गाण्यात राऊ आणि सुशीलाचे हळूवार खुलत जाणारे प्रेम दिसत आहे. बाईच्या नजरेला नजर न देणाऱ्या राऊच्या डोळ्यांतून आता प्रेम व्यक्त होताना दिसतेय, त्यामुळे आता वाड्यात काय घडणार, हे जाणून घेण्यासाठी ‘अथांग’ ही वेब सिरीज पाहावी लागेल.
मागील भागात प्रेक्षकांनी पाहिले, राऊ आणि सुशीला यांच्यात प्रेमाची कळी फुलत असून दोघं एकमेकांच्या जवळ येत आहेत. याचे काय पडसाद उमटतील, पूर्वजांच्या पापाचे फळ राऊला भोगावे लागणार का, सरदेशमुखांचा वाडा शापमुक्त होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढील भागांत दडलेली आहेत.
दिग्दर्शक जयंत पवार म्हणतात, "अथांग ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे, हे पाहून समाधान वाटतंय. प्लॅनेट मराठी ओटीटीवर पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. तो यशस्वी होताना दिसतोय. सहा भागांत प्रदर्शित करण्यात आलेली ही वेब सिरीज क्षणोक्षणी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. त्यामुळेच प्रेक्षक पुढील भागांची आतुरतेने वाट पाहतात. यावरूनच प्रेक्षकांना ‘अथांग’ आवडतेय, हे कळतेय."
'अथांग' या वेब सिरीजमध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी - सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.