आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हॅपी बर्थडे:हर्षदा खानविलकर यांना लॉ कॉलेजमधून काढून टाकण्यात होते, नीना गुप्तांनी दिला होता करिअरचा पहिला ब्रेक 

मुंबईएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'अस्तित्व प्रेमकहाणी' या मालिकेतील शुगना, 'कळत नकळत' मालिकेतील कामिनी अभ्यंकर आणि 'पुढचं पाऊल' या मालिकेतील आक्कासाहेब या जवळच्या व्यक्तिरेखा असल्याचे हर्षदा सांगतात.

'पुढचं पाऊल' या मालिकेत ''आक्कासाहेब'' या कणखर स्त्रीच्या व्यक्तिरेखेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 47 वर्षे पूर्ण केली आहेत. अभिनय क्षेत्राची कुठलीही परंपरा नसलेल्या व एका मध्यमवर्गीय कुटुंबातील 2 जुलै 1973 रोजी हर्षदा यांचा जन्म झाला. त्यांची जॉईंट फॅमिली होती. आईवडील धाकटी बहीण, काका-काकू, आत्या यांसह एकत्र कुटुंबपद्धतीत हर्षदा लहानाच्या मोठ्या झाल्या. त्यांचे वडील दिलीप कुमार आणि सुनील गावस्करांचे मोठे फॅन होते. मुंबईतील किंग जॉर्ज या शाळेत त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे किर्ती कॉलेजमधून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. बालपण खूप आनंदात आणि सुखात गेल्याचे हर्षदा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.

 • काढून टाकण्यात आले होते लॉ कॉलेजमधून

किर्ती कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर हर्षदा यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमध्ये लॉमध्ये प्रवेश घेतला. मात्र याच काळात त्यांचे अभिनय क्षेत्रात बस्तान बसत होते. त्यामुळे कॉलेजकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ लागले होते. वर्षभर त्यांनी कॉलेज केले. मात्र पुढे कॉलेज करणे शक्य नव्हते. त्यामुळे कॉलेजने मला सन्मानपूर्वक काढून टाकले होते, असे हर्षदा यांना एका मुलाखतीत गंमतीत सांगितले होते.

 • पहिला ब्रेक

कॉलेजमध्ये असतानाच्या काळात हर्षदा खानविलकर यांचे त्यांच्या एका फॅमिली फ्रेंडने काही फोटोज काढले होते. ते एका मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकले होते. विशेष म्हणजे त्यांचा फोटो मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकला आहे, हे त्यांना ठाऊकच नव्हते. एका ओळखीच्या व्यक्तीनेच त्यांना फोटो झळकल्याची बातमी दिली. हर्षदा यांचा मॅगझिनवरील फोटो बघून प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी हर्षदासोबत संपर्क साधला.

 • हर्षदा यांच्यावर इम्प्रेस झाल्या नीना गुप्ता

मुलीला एवढी मोठी संधी चालून आली, म्हणून त्यांचे वडील खूप आनंदी झाले. हर्षदा आपल्या वडिलांसोबत नीना गुप्तांना भेटायला गेल्या. तेथे त्यांच्याशी भेट झाल्यानंतर नीना यांनी चार ओळी हर्षदा यांन म्हणायला सांगितल्या. हर्षदा यांचे पाठांतर चांगले असल्याने त्यांनी लगेच त्या चार ओळी म्हणून दाखवल्या. पहिल्याच भेटीच नीना गुप्ता हर्षदा यांच्यावर इम्प्रेस झाल्या आणि त्यांनी त्यांच्या 'दर्द' या मालिकेसाठी त्यांची निवड केली. या मालिकेत नीना गुप्तांच्या बॉयफ्रेंडच्या बहिणीची भूमिका हर्षदा यांना मिळाली. तू तुझे कपडे घरुन मागवून घे, आजपासूनच शूटिंगला सुरुवात करुयात, असे नीना यांनी हर्षदा यांना म्हटले आणि अशाप्रकारे हर्षदांचा अभिनयातील श्रीगणेशा झाला.

 •  'दर्द' मालिकेत केले होते खूप वाईट काम

'दर्द' या मालिकेत खूप वाईट काम केल्याचे हर्षदा खानविलकर गंमतीने सांगतात. या मालिकेनंतर आपले या क्षेत्रात काही खरे नाही, असे हर्षदा यांना वाटू लागले होते. म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण करायचे ठरवले आणि लॉला अॅडमिशन घेतले होते.

 • सहा महिने आईने धरला होता अबोला

अभिनय क्षेत्रासाठी शिक्षण अर्धवट सोडण्याचा हर्षदा यांचा निर्णय त्यांच्या आईला आवडला नव्हता. त्या त्यांच्यावर रागावल्या होत्या. तब्बल सहा महिने त्यांच्या आई त्यांच्याशी बोलल्या नव्हत्या. मात्र वडिलांनी त्यांना नेहमीच पाठिंबा दिला. 1999 मध्ये हर्षदा यांनी 'आभाळमाया' या मालिकेसाठी त्यांनी ऑडीशन दिली आणि त्यांची निवड झाली. ही मालिका करिअरचा टर्निंग पॉईंट ठरल्याचे हर्षदा सांगतात.

 • व्यायसायिक नाटकांतून भूमिका

कॉलेजमध्ये असताना 'खेळ माझा', 'लग्नाची बेडी' या व्यायसायिक नाटकातून त्यांनी भूमिका केली. हळूहळू अभिनय क्षेत्रात बस्तान बसू लागले. त्यावेळी दुरदर्शनवरील दामिनी आणि पुढे आभाळमाया मालिकांमध्ये त्यांना काम मिळाले. दामिनी आणि आभाळमाया या मालिकेतील त्यांच्या भूमिकांचे कौतुक झाले. ऊन पाऊस, कळत नकळत या मालिकांमध्ये त्यांनी काम केले.

 • अभिनयाकडून निर्मिती क्षेत्राकडे

'गुरुकुल' या मालिकेत त्यांनी 18 वर्षांच्या मुलीच्या आईची भूमिका वठवली होती. 'उचापती' या विनोदी मालिकेतही त्यांनी काम केले. त्यानंतर 'किमयागार' मालिकेत त्या झळकल्या. या मालिकेनंतर हर्षदा खानविलकर निर्मिती क्षेत्राकडे वळल्या.

 • संजय जाधव यांच्याशी मैत्री

दरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांच्यासोबत हर्षदा यांची मैत्री झाली. त्यांनी मिळून ‘हॅपनिंग्ज अनलिमिटेड’ या नावाने निर्मिती संस्था काढली. ‘बेधुंद मनाच्या लहरी’ ही त्यांची निर्मिती असलेली पहिला मालिका होती. ‘झी’वर ही मालिका लोकप्रिय झाली. उमेश जाधव, अंकुश चौधरी, सोनाली खरे, दीपा तेली या मालिकेत होते. राजीव पाटील या मालिकेते सहायक दिग्दर्शक होते.

 • प्रसिद्ध कॉश्च्युम डिझायनर आहेत हर्षदा

अभिनयासोबतच हर्षदा कॉश्च्युम डिझायनरसुद्धा आहेत. 'बेधुंद मनाच्या लहरी' या मालिकेसाठी संजय जाधव यांनी हर्षदा यांना कॉश्च्युम डिझायनिंग करायला सांगितले. त्यानंतर त्यांनी अनेक मालिका आणि सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझायनिंग केले आहे.

0