आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बर्थडे स्पेशल:असा झाला सईचा सांगली ते मुंबईपर्यंतचा प्रवास... आदेश बांदेकरांनी विचारले होते मालिकेत काम करणार का?

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सई ताम्हणकरचा जन्म 25 जून 1986 रोजी सांगलीत झाला.

ताज्या दमाची, आश्‍वासक आणि गुणी अभिनेत्री म्हणून मराठी सिनेसृष्टीत सई ताम्हणकरकडे बघितले जाते. सांगलीत लहानाची मोठी झालेली, अस्सल मराठमोळी सई हटके  भूमिकांमधून प्रेक्षकांसमोर येत असते. विविध भूमिकांमधून चमक दाखवणारी सई मराठी अभिनेत्रीचे ख-या अर्थाने आधुनिक रूप आहे.

सई बोल्ड आणि बिनधास्त असल्याचे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे.  मात्र तिच्याविषयीच्या अनेक गोष्टी आजही तिच्या चाहत्यांना ठाऊक नाहीयेत. म्हणून सईविषयीची अशा खास गोष्टी ज्या तिच्या चाहत्यांना माहित नाहीत, त्या या पॅकेजमधून जाणून घेता येतील. तिच्या आवडी-निवडी, मुंबईतील तिचा प्रवास यांसह बरंच काही...

सईचा जन्म सांगलीत झाला. तिच्या घरचे वातावरण पहिल्यापासून खूप ओपन आहे. तिचे आई-बाबा पुरोगामी विचारसरणीचे. तिचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे पहिल्यापासूनच घरात पाश्‍चात्य पद्धतीचं वातावरण होते. याच वातावरणात सई लहानाची मोठी झाली.  ​​​​​​

सईचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान हे सईच्या शाळेचे नाव आहे.  सईला बालपणापासूनच स्पोर्ट्सची विशेष आवड होती. ती कबड्डीची राज्यस्तरीय खेळाडू आहे.  सईने लहानपणी एकच नाटक केले होते. ते होते मूक नाट्य. त्यामध्ये ती झाड झाले होते. तिला कल तेव्हा खेळाकडेच होता.

कॉलेजमध्ये असताना आईच्या खास मैत्रिणीच्या आग्रहाखातर सईने एका नाटकात काम केले होते. तेव्हा पुन्हा नाटकात काम करण्याची इच्छा वाढली. अजून एक नाटक करण्याची आवड त्यातून निर्माण झाली. अल्फा महाकरंडक एकांकिका स्पर्धा त्यावेळी व्हायच्या. त्यामध्ये तिने एक नाटक केले आणि विगाभीय स्तरावर त्यासाठी तिला पारितोषिकही मिळाले होते. सईने केलेले पहिले नाटक म्हणजे 'आधे-अधुरे'. विजय तेंडुलकरांनी मराठीत रुपांतरित केलेले ते नाटक. या पहिल्या स्पर्धात्मक नाटकामधूनच सईला पहिल्या मालिकेसाठी विचारणा झाली होती.  

अल्फा करंडक स्पर्धा बघण्यासाठी त्यावेळी आदेश बांदेकर सांगलीत आले होते. त्यांनीच सईला सिरियलमध्ये काम करणार का, म्हणून विचारले आणि तिने काहीही विचार न करता हो म्हणून टाकले. 'या गोजिरवाण्या घरात'चे कास्टिंग त्यावेळी सुरू होते आणि सईला त्यात काम करण्याची संधी मिळाली. 'या गोजिरवाण्या घरात' या पहिल्या मालिकेच्या शूटिंगच्या निमित्ताने सई मुंबईत दाखल झाली होती. तेव्हा ती केवळ 19 वर्षांची होती.  

सईने कराटेचे शिक्षण घेतले आहे. एक छंद आणि आवड म्हणून ती कराटे शिकली होती. सई पहिल्यापासूनच धडाडीची आणि डेअिरगबाज मुलगी आहे. कुणी छेडलं तर कानाखाली दोन मारायला ती कमी करत नाही.  

एखादी भूमिका निवडताना सई खूप विचार करते. याविषयी ती म्हणते, ''भूमिकेमुळे मलाच माझी नवीन बाजू कळणार आहे का, माझ्यात माणूस म्हणून काही बदल होणार आहे का, याचा विचार मी सर्वप्रथम करते. त्यानंतर दिग्दर्शक, निर्माता कोण आहे हे पाहते.''

सईने मुंबईत आल्यानंतर ‘एम टीव्ही’साठी ऑडिशन दिली होती. मात्र त्यावेळी तिची निवड झाली नव्हती. त्याचकाळात आपल्याला सांगलीत चांगली संधी मिळणार नाही असे सईला वाटले आणि तिने मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. सईचा पहिला सिनेमा 'सनई चौघडे'. सुभाष घईंच्या 'ब्लॅक ऍण्ड व्हाईट'मध्ये सईने काम केले होते. त्यावेळी 'सनई चौघडे'चे प्लॅनिंग सुरू होतं. या सिनेमात काम करणार का, अशी विचारणा सुभाष घईंनी तिला केली. सई श्रेयस तळपदेला जाऊन भेटली. चार ऑडिशन्स झाल्या आणि सिनेमात तिला भूमिका मिळाली.  

फावल्या वेळेत सईला झोपायला आवडतं. अगदी सलग 22-22 तास ती झोपू शकते. याव्यतिरिक्त कधी कधी सिनेमा किंवा नाटक बघायला जाते. काहीवेळा मित्रांसोबत मिळून पार्टी करते. तिला वाचानाची मुळीच आवड नाही. पण वाचन वाढवायला हवे, असे तिला जाणवते. त्यामुळे कटाक्षाने महिन्याला एकतरी पुस्तक ती आवर्जून वाचते. 

सईने आतापर्यंत विनोदी, रहस्यमय, गंभीर, कौटुंबिक अशा प्रकारच्या अनेक सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. मात्र गतिमंद स्त्रीची भूमिका करायची तिची इच्छा आहे. अभिनयात स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, ओम पुरी सईला परफेक्‍ट वाटतात. डायलॉग डिलिव्हरीत प्रियांका चोप्रा तिला भावते. डान्समध्ये माधुरी दीक्षितला पर्याय नसल्याचे ती सांगते. अभिनयातील वैविध्यं आणि क्रिएटिव्हिटी जपणारा म्हणून आमीर खान सईसाठी आदर्श आहे. 

बातम्या आणखी आहेत...