आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी खासदार संभाजी छत्रपती यांनी सुबोध भावेच्या ‘हर हर महादेव’ आणि महेश मांजरेकरांच्या आगामी ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध दर्शवला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. या चित्रपटांतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीचा चुकीचा इतिहासाची दाखवला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्ह्यातील विवियाना मॉलमध्ये 'हर हर महादेव' या चित्रपटाचा शो बंद पाडला. यावेळी प्रेक्षकांना थिएटरमधून हुसकवून लावताना एका प्रेक्षकाला मारहाण झाल्याचेही वृत्त आहे. या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात ठाण्यातील वर्तक नगर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कलमांखाली दाखल झाला गुन्हा
ठाण्याच्या वर्तकनगर पोलिस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या 141, 143, 146, 149, 323, 504 अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या 100 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे
मॉलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
दरम्यान, आज कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून बंदोबस्त ठेवला जाणार आहे. सध्या 15 ते 20 पोलीस कर्मचारी विवियाना मॉल परिसरात तैनात आहेत.
मनसेकडून आज त्याच विवियाना मॉलमध्ये मनसे कडून स्पेशल शो
सोमवारी राष्ट्रवादीने चित्रपटाचा शो बंद पाडल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून 'हर हर महादेव' चित्रपटाचा मोफत शो ठेवण्यात आला आहे, सायंकाळी सव्वा सहा वाजता हा शो ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल याच ठिकाणी हा शो बंद पाडला होता. आज पुन्हा एकदा त्याच ठिकाणी मनसे हा चित्रपट सर्व प्रेक्षकांसाठी मोफत ठेवणार आहेय काल ज्या प्रेक्षकाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज पुन्हा एकदा हा शो पाहण्यासाठी बोलून असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.