आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलेश साबळेंचा माफीनामा:'त्या' भूमिकेसाठी निलेश साबळेंनी मागितली नारायण राणेंची माफी, म्हणाले - 'आमच्या टीमकडून पुन्हा अशी चूक होणार नाही'

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या का मागितली माफी?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या मालिकेचे दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक निलेश साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केंद्रीय लघुउद्योग मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची भेट घेत त्यांची माफी मागितली आहे.

का मागितली माफी?
23 नोव्हेंबर रोजी निलेश साबळे आणि त्यांच्या सहका-यांनी नारायण राणे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या काळात दिवाळी अधिवेशन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात काही राजकीय व्यक्तींची विडंबनं दाखवली होती. त्यात राणे यांचे हुबेहुब पात्र दाखवण्यात आले होते. या पात्रावर राणे समर्थकांनी आक्षेप नोंदवत राणे यांचा अवमान झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर त्यांनी सातत्याने वाहिनीला आणि साबळे यांना फोन करून माफीची मागणी केली होती. त्यावरून सोशल मीडियावर यावरून वादंग निर्माण झाला होता. हा वाद अधिक चिघळू नये यासाठी, साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राणे यांची भेट घेत माफी मागितली.

मंगळवारी निलेश साबळे आणि त्यांच्या सहका-यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. यावेळी निलेश साबळे नारायण राणे यांच्या पाया पडले आणि हात जोडून माफी मागितली. यावेळी नारायण राणे यांच्यासह त्यांचे पुत्र आणि आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते. राणे यांच्या समर्थकांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

चूक पुन्हा होणार नाही
नारायण राणे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमी सन्मान केला आहे. अशावेळी एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. परत अशी चूक होणार नाही. असे निलेश साबळे यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...