आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले मांजरेकरांचे कौतूक:म्हणाले - महेश मांजरेकर खऱ्या अर्थाने 'दबंग' आहेत

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुरेशी प्रोडक्शन आणि महेश मांजरेकर यांची प्रस्तुती असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा नुकतीच करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही घोषणा झाली. या चित्रपटातून बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत असून यात तो छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत झळकणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. नेसरीखिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आपल्या आत्मबलिदानाने इतिहास अजरामर केला. प्रतापराव आणि त्यांच्या शिलेदारांचा हा अतुलनीय पराक्रम दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटातून भव्य स्वरूपात घेऊन येत आहेत. प्रतापरावांच्या भूमिकेत असणारे अभिनेता प्रवीण तरडेसह हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चित्रपटाला शुभेच्छा देताना महेश मांजरेकरांचे तोंडभरून कौतूक केले. ‘अनेक कठीण प्रसंगांवर मात करत महेश मांजरेकर यांनी मोठे यश मिळवले आहे. ते ध्येयवेडे आहेत आणि ध्येयवेडी माणसंच इतिहास घडवितात. महेश मांजरेकर खऱ्या अर्थाने दबंग आहेत,' असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

‘महेश मांजरेकर नेहमीच भव्य स्वप्न घेऊन येतात. त्यांनी पाच वर्षापूर्वी मला या चित्रपटाची गोष्ट सांगितली होती. मराठी चित्रपटसृष्टी कात टाकतेय यात महेश मांजरेकर यांचा मोलाचा वाटा असल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी आवर्जून नमूद करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

प्रतापरावांकडून अभय मिळालेला बहलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धूमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका' अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. प्रतापराव गुर्जर आपल्या सहा शिलेदारांसह शेकडोच्या सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बहलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मंगळवार 24 फेब्रुवारी 1674 ला सात मर्दांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. संकलन मनीष मोरे तर छायांकन अभिमन्यू डांगे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे असणार आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत हितेश मोडक यांचे आहे. साहस दृश्ये प्रद्युमन कुमार स्वान यांची आहेत. उमेश शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाचा थरार 2023 मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...