आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछोट्या पडद्यावरील ‘रंग माझा वेगळा’ला या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर असतानाच मालिकेत कार्तिकीची भूमिका वठवणारी बालकलाकार साईशा भोईर हिने मालिकेचा निरोप घेतला. आता तिच्याऐवजी लवकरच बालकलाकार मैत्रेयी दाते कार्तिकीच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
कोण आहे मैत्रेयी?
मैत्रेयीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड आहे. मैत्रेयीची ही आवड लक्षात घेऊन तिच्या पालकांनी अभिनय अकादमीमध्ये तिचा प्रवेश घेतला. मैत्रेयीने बऱ्याच जाहिराती आणि बालनाट्यांमध्ये काम केलं आहे. अभिनयासोबतच मैत्रेयी शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेत असून तिला चित्रकलेचीही आवड आहे.
स्पृहासोबत जमली गट्टी
मैत्रेयीची ‘रंग माझा वेगळा’ ही आवडती मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र तिच्या ओळखीचं आहे. कार्तिकी आणि दीपिकाची जोडी तर तिला खूपच आवडते. आपलं आवडीचं पात्र साकारायला मिळणार हे कळल्यावर तिला अतिशय आनंद झाला. सेटवरही मैत्रेयीचं खास स्वागत करण्यात आलं. दीपिकाची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या चिमुकल्या स्पृहासोबत तर तिची पहिल्या दिवासापासून छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधल्या फावल्या वेळेत अभ्यास आणि मनसोक्त खेळणं हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. त्यामुळे मैत्रेयीसाठी हा मालिकेचा सेट नसून दुसरं घरच आहे. पडद्यामागची दोघींची ही खास मैत्री पडद्यावरही नक्कीच दिसेल.
साईशा भोईर हिने का सोडली मालिका?
साईशाच्या आईवडिलांनी अलीकडेच सोशल मीडियावर लाइव्ह येत तिने ही मालिका का सोडली याचे कारण सांगितले होते. 'साईशा आता रंग माझा वेगळा या मालिकेत दिसणार नाही. पण ती सोशल मीडियाद्वारे तुमच्या भेटीला येत राहील. आम्ही कल्याणला राहतो आणि मालिकेचे शूटिंग मालाडला होते. दररोज प्रवासात दोन ते अडीच तास लागतात. त्यामुळे तिला शाळा आणि अभ्यासाठी फारसा वेळ देता येत नाही. तिच्या तब्येतीवरही परिणाम होऊ लागला आहे,' असे साईशाच्या वडिलांनी सांगितले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.