आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत सर्व प्रकारच्या चित्रीकरणाला बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक हिंदी आणि मराठी वाहिन्यांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्याचा तोडगा काढला होता. मात्र आता पुन्हा एकदा काही मालिकांच्या चित्रीकरणाला ब्रेक लागणार असल्याची चिन्ह आहेत. कारण गोव्यात आता येत्या 10 मे पर्यंत मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोच्या शूटिंगवर बंदी घालण्यात आली आहे. गोव्यातील फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी गोव्यात सुरू असलेल्या चित्रीकरणाला विरोध दर्शवला. त्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत सर्व शूटिंगवर बंदी घातली आहे.
'सूर नवा ध्यास नवा'च्या सेटवर निर्माण झाला होता गोंधळ
आमदार विजय सरदेसाई यांनी मडगाव येथे रविंद्र भवन येथे सुरु असलेल्या ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या सेटवर गोंधळ घालत शूटिंगला विरोध दर्शवला होता. चित्रीकरणामुळे फातोर्डा आणि मडगाव या भागात कोरोना रुग्ण वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टनसिंगचे पालन केले जात नसल्याचेही त्यांचे म्हणणे होते. रविंद्र भवनमध्ये 150 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. या आंदोलनानंतर आता रविंद्र भवनमध्ये कोरोना चाचणीसाठी लॅब सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. विजय सरदेसाई यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.
गोव्यात सुरु असलेल्या मालिकांच्या चित्रीकरणाला पुन्हा लागणार ब्रेक
या मराठी मालिकांचे सुरु होते चित्रीकरण
महाराष्ट्रात चित्रीकरणावर बंदी आल्यानंतर सुख म्हणजे नक्की काय असतं, रंग माझा वेगळा, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, आई माझी काळुबाईसह सूर नवा ध्यास नवा या सांगितिक कार्यक्रमाचे चित्रीकरण गोव्यात सुरु होते. मात्र आता गोवा प्रशासनाच्या निर्णयानंतर या कार्यक्रमांच्या चित्रीकरणाला पुन्हा एकदा ब्रेक लागणार आहे.
या हिंदी मालिकादेखील आल्या अडचणीत
गोव्यात सध्या कुंडली भाग्य, कुमकुम भाग्य, मोलकी, ये है चाहतें, आपकी नजरों ने समझा, अपना टाइम भी आएगा, गुम है किसी के प्यार में, शौर्य आणि अनोखी की कहानी या मालिकांचे चित्रीकरण सुरु होते. आता चित्रीकरण थांबल्याने निर्मात्यांना मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.