आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलीप प्रभावळकर यांचा वाढदिवस:..तर परेश रावल यांनी साकारला असता चौकट राजामधील नंदू, ऐनवेळी झाली होती दिलीप प्रभावळकरांची एन्ट्री

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या दिलीप प्रभावळकर यांच्या खासगी आयुष्याविषयी...

हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीवरुन ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा सुरु झालेला प्रवास आजही असाच सुरु आहे. वयाच्या 77 व्या वर्षीही ते आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. बावळट चिमणराव, हसवाफसवीमधील सहा पात्रे, चौकट राजामधील गतिमंद नंदू, खलनायक तात्या विंचू, मुन्नाभाईतील गांधी... त्यांनी रंगवलेली प्रत्येक भूमिका वेगळी आणि प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहणारी आहे. आज दिलीप प्रभावळकरांचा वाढदिवस आहे. 4 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेल्या प्रभावळकर 1972 सालापासून अभिनयाशी जुळलेले आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्याशी निगडीत काही खास गोष्टी सांगत आहोत.

दिलीप प्रभावळकरांना व्हायचे होते शास्त्रज्ञ
दिलीप प्रभावळकर यांनी मुंबईतील मांटुगास्थित रुईया कॉलेजमधून जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली. शास्त्रज्ञ व्हायची त्यांची इच्छा होती.

औषध निर्माण कंपनीत होते मोठ्या पदावर
अभिनयात पदार्पण करण्यापूर्वी प्रभावळकर टीसीएफ या एकेकाळी नावाजलेल्या औषध निर्माण कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होते. त्याच काळात ते बालरंगभूमीशी जोडले गेले व पुढे अभिनेते म्हणून नावारूपाला आले.

ऐनवेळी मिळाली दिलीप प्रभावळरांना भूमिका
'चौकट राजा' या सिनेमातील दिलीप प्रभावळकरांनी साकारलेली भूमिका सुरुवातील परेश रावल यांना ऑफर झाली होती. सिनेमात दिलीप प्रभावळकरांची निवड स्मिता तळवलकरच्या व्यवहारी नव-याच्या भूमिकेसाठी झाली होती. प्रभावळकरांच्या भूमिकेसाठी कपड्यांची तयारीसुद्धा झाली होती. पण शेवटच्या क्षणी परेश रावल सिनेमातून बाहेर पडले आणि प्रभावळकरांना गतिमंद मुलाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली.

'लगे रहो मुन्नाभाई'च्या सेटवर प्रभावळकरांना ओळखू शकला नव्हता संजय दत्त
'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमात दिलीप प्रभावळकर यांनी गांधीजींची भूमिका वठवली होती. सेटवर संजय दत्त नेहमी प्रभावळकारांना गांधीजींच्या गेटअपमध्येच बघायचा. एकेदिवशी प्रभावळकर विना गेटअप सेटवर उपस्थित होते. त्यावेळी संजय दत्त चक्क त्यांना ओळखूच शकला नव्हता. हा किस्सा स्वतः दिलीप प्रभावळकरांनी शेअर केला होता.

अनेक पुरस्कारांनी झाले आहेत सन्मानित
गांधींच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पारितोषिक आणि रंगभूमीला दिलेल्या योगदानासाठी संगीत नाटक अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार या दोन अत्यंत मानाच्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय 'बोक्या सातबंडे' या पुस्तक-मालिकेसाठी त्यांना साहित्य अकादमीचा 'बाल साहित्य' पुरस्कार प्रदान करण्यात आला.

'हसवाफसवी' नाटकात सहा बहुरंगी भूमिका
'हसवाफसवी' या त्यांनीच लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या नाटकातील सहा बहुरंगी व विविधढंगी भूमिका त्यांनी साकारल्या होत्या. या नाटकातील वेगवेगळे आवाज काढण्यासाठी प्रभावळकरांनी अशोक रानडे यांच्याकडे धडे गिरवले होते.

संगीताची आवड
पुनर्जन्म असेलच, तर मला संगीताचं शिक्षण घ्यायला आवडेल, असे दिलीप प्रभावळकर म्हणतात. संगीताची आवड होती, पण त्याचं शिक्षण घेता आलेले नाही. ही आवड मी 'चौकट राजा' आणि 'हसवा फसवी'त गाऊन चोरट्या मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि पुढच्या जन्मात अभ्यासाठी मी आर्ट्स शाखा निवडेल, असे प्रभावळकरांनी एका मुलाखतीत म्हटले होते.

क्रिकेटची आवड
दिलीप प्रभावळकरांना क्रिकेटची खूप आवड आहे. क्रिकेटपटूंवर आधारित 'गुगली' नावाचा स्तंभ प्रभावळकर लिहायचे. या गुगलीचे पुढे पुस्तकात रुपांतर झाले. या पुस्तकाच्या नऊ आवृत्या आल्या.

कॉलेजमध्ये दोन नाटकांत भूमिका
कॉलेजमध्ये असताना दिलीप प्रभावळकरांनी दोनच नाटकांत कामे केली होती. यामध्ये शं. ना. नवरे यांचे 'जनावर' हे नाटक होते. त्याला बक्षीससुद्धा मिळाले होते.

लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा घाबरायचा
दिलीप प्रभावळकांनी 'झपाटलेल्या' या सिनेमात तात्या विंचूची भूमिका साकारली होती. सिनेमातील भूमिकेची लांबी फार कमी होती. पण सिनेमातील आवाज सगळ्यांनाच भावला. लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय त्यांच्या आवाजाला नेहमी घाबरायचा.

दिलीप प्रभावकरांची खंत
'एक झुंज वा-याशी' आणि 'कमल 302' या नाटकांचे अवघे काहीच प्रयोग झाल्याची खंत दिलीप प्रभावळकरांना वाटते.

खासगी आयुष्यात सौम्य स्वभाव
दिलीप प्रभावळकर पडद्यावर आक्रमक, कणखर भूमिका साकारताना दिसतात. मात्र खासगी आयुष्यात त्यांचा सौम्य स्वभाव आहे. उग्र, रागीट व्यक्तिमत्त्वाच्या भूमिका केल्या असल्या तरीही माझा स्वभाव नरमच राहिला, असे ते सांगतात.

बातम्या आणखी आहेत...