आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सक्लूझिव्ह बातचीत:'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी'साठी पुण्यात मार्शल आर्टचे धडे गिरवतेय सोनाली कुलकर्णी, भारतात 10 टक्के तर यूकेत होणार आहे चित्रपटाचे 90 टक्के शूटिंग

उमेशकुमार उपाध्याय2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट इंग्रजीत डब होणार नाही, तर मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये शूट केला जाईल.

नटरंग, पोस्टर गर्ल, अजिंठासारख्या गाजलेल्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लवकरच मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटात छत्रपती ताराराणीची भूमिका साकारणार आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत तयार होणा-या या चित्रपटाचा 10% भाग भारतात शूट केला जाणार आहे आणि उर्वरित 90% चित्रीकरण यूकेत होणार आहे. सोनालीने तिच्या पात्रासाठी घोडेस्वारी, तलवारबाजी आणि लाठी-काठीचे कठोर प्रशिक्षण घेतले आहे. या चित्रपटातील तिच्या भूमिकेविषयी केलेली ही खास बातचीत...

  • मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी या चित्रपटात तू मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तुला हा प्रोजेक्ट कसा मिळाला?

चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल जनार्दन जाधव यांनी माझ्याशी संपर्क साधला होता. चर्चा अंतिम झाल्यानंतर लॉकडाऊनपूर्वी आम्ही दोघांनी मिळून त्यावर काम सुरु केले. मग आम्ही दोघांनी निर्माते अक्षय बर्दापूरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कथा ऐकली आणि आमची तयारी पाहिली, मग तेही चित्रपटाची निर्मिती करण्यास तयार झाले. पण हा चित्रपट प्रादेशिक न बनवता तो संपूर्ण जगासमोर आणावा, असे त्यांना वाटले. त्यांनी ब्लॅक हंगर स्टुडिओ आणि ऑर्व्हो स्टुडिओ या दोन अमेरिकन स्टुडिओसोबत हा प्रोजेक्ट शेअर केला. फक्त मराठीतच नव्हे तर इंग्रजीतही हा चित्रपट बनवला गेला पाहिजे आणि हॉलिवूड स्टुडिओमध्ये शूट केला गेला पाहिजे, कारण त्यात बरीच युद्ध दृश्ये आहेत. हा चित्रपट जागतिक पातळीवर येऊ शकते, असा विश्वास त्यांना वाटला. अशा प्रकारे अक्षय सर आणि अमेरिकन स्टुडिओने मिळून मराठी आणि इंग्रजी भाषेत चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला.

  • ऐतिहासिक चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची जबाबदारी कशी वाढते? यासाठी तू कोणती विशेष तयारी करत आहे?

ऐतिहासिक चित्रपटासाठी अॅक्शन, बोलीभाषा, लहेजा, पेहराव या सगळयांची तयारी करावी लागते, कारण हे सर्व एक युग सादर करत प्रेक्षकांना वेगळ्या काळात घेऊन जातो. त्या काळाबद्दल आणि त्या पात्रांबद्दल आपण जे काही वाचले, ऐकले आहे त्याला न्याय देण्याची मोठी जबाबदारी असते. सर्वप्रथम त्या काळातील भाषा कशी बोलायची यासाठी भाषेपासून तयारी सुरू होते. प्रसिद्ध इतिहासकार डॉ. जयसिंग पवार यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. त्यांनी ज्या पद्धतीने तो काळ उभा केला, तो साकारण्याचा प्रयत्न करत आहे. लूक, भाषा यासोबतच छत्रपती ताराराणींनी अनेक युद्धे लढली होती, त्यासाठी तयारी केली आहे. शिवकालीन युद्धकलेमध्ये ज्या प्रकारे तलवारी, लाठी-काठीचा वापर केला जात होता, ती युद्धकला मी शिकत आहे. पात्राचा लहेजा, हावभाव यासाठी वेगळी तयारी सुरू आहे. मी पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील व्यक्तिरेखा साकारत आहे. जेव्हा त्यांच्या कुटुंबातील किंवा आजूबाजूच्या व्यक्तीचे एखादे पात्र साकारले जाते, तेव्हा जबाबदारी वाढते की त्यांच्या प्रतिमेला धक्का लागू नये, कारण येथे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करतात.

  • लाठी-काठी, घोडेस्वारी, तलवारबाजी इत्यादींपैकी तू आतापर्यंत काय शिकली?

घोडेस्वारी, तलवारबाजी, काठ्या या तीन मुख्य गोष्टी त्या काळात शिवाजी महाराजांचे सर्व सैनिक करत असत. छत्रपती ताराराणी या शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीराव मोहिते यांच्या कन्या होत्या. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या मुलीला सर्व युद्ध कला शिकवली होती. ताराराणी या युद्धकलेत निपुण होत्या. पुण्यात एक ग्रुप आहे, जो मुलींना शिवकालीन युद्ध कला शिकवतो. अनेक महिन्यांपासून माझा घोडेस्वारी, तलवारबाजी, लाठी-काठीचा सराव त्यांच्यासोबत सुरू आहे. जोपर्यंत चित्रपट फ्लोअरवर येत नाही तोपर्यंत हे प्रशिक्षण सुरूच राहणार आहे. त्या सर्व गोष्टी माझ्या देहबोलीत आल्या पाहिजेत, म्हणून मी अधिक सराव करत आहे.

  • चित्रपट फ्लोअरवर कधी येणार?

आम्ही जानेवारी 2022 मध्ये चित्रीकरणाला सुरुवात करणार आहोत. चित्रपटाचे 10 टक्के शूटिंग भारतात होणार आहे. उर्वरित 90 टक्के चित्रपटाचे चित्रीकरण यूकेमध्ये होणार आहे. याबाबत अधिक तपशीलवार माहिती आमचे दिग्दर्शकच देऊ शकतील. परंतु भारतात जवळपास 15 ते 20 दिवसांचे शूटिंग शेड्युल असेल. चित्रीकरण पश्चिम महाराष्ट्रात होणार आहे. यूकेमध्ये जवळपास दोन महिने शूटिंग चालणार आहे. आम्ही प्रत्येक सीन आधी मराठी आणि नंतर इंग्रजीत शूट करणार आहोत. या अर्थाने हा काळ दुप्पट असणार आहे. चित्रपट डब होणार नाही, दोन्ही भाषांमध्ये शूट केला जाईल, हे महत्त्वाचे.

  • तुझ्या करिअरमध्ये आंतरराष्ट्रीय भाषेतील चित्रपटाची भर पडणार आहे, त्याकडे तू कसे बघते?

अर्थातच असा प्रोजेक्ट मी करू शकले ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मी मराठी मुलगी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. छत्रपती ताराराणींनी नऊ वर्षे औरंगजेबावर मात केली होती. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती ताराराणी यांचे पती राजाराम महाराज यांच्या पश्च्यात प्रजेला वाचवणारे कोणी नव्हते, मग एकट्या छत्रपती ताराराणींनी आता माझे राज्य मीच वाचवणार असा निर्धार केला. नऊ वर्षे त्यांनी अतिशय आश्चर्यकारक रणनीती आखली. त्यांनी केवळ तलवारबाजीनेच नव्हे, तर बुद्धी आणि रणनीतीनेही काम केले. अशा प्रकारे औरंगजेबाला मात दिली. या नऊ वर्षांत त्यांनी औरंगजेबाकडून त्यांच्या साम्राज्यातील 100 हून अधिक किल्ले परत घेतले. या चित्रपटातून तुम्हाला त्याबद्दल बरेच काही कळेल. एवढी मोठी कथा जागतिक पडद्यावर आणण्याची संधी मला मिळत आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी ते शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

  • एक वेब सीरिज देखील तू करत आहे, जी OTT वर येणार आहे. ती कुठवर आली आहे?

ही सीरिज जानेवारी महिन्यात अमेझॉन प्राइमवर प्रसारित होईल. याबाबत अधिक बोलण्यास अद्याप परवानगी मिळालेली नाही. होय, पण ही माझी पहिलीच वेब सीरिज आहे, त्यामुळे मी त्याबद्दल उत्सुक आहे. नेहमीच OTT वर काही चांगले काम करायचे होते. यामध्ये माझ्या चाहत्यांना काहीतरी चांगलं पाहायला मिळणार आहे. ही एक क्राइम थ्रिलर वेब सीरिज आहे. यात लोकप्रिय स्टार कास्ट आहे. त्याचे शूटिंग, डबिंग सर्वकाही पूर्ण झाले आहे. मात्र नाव अद्याप ठरलेले नाही. लवकरच त्याचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित होईल, त्यानंतर मी याबद्दल जास्त काही बोलू शकेल.

  • तुझ्या आजवरच्या करिअरच्या प्रवासातील कोणत्या टप्प्यावर तुला आव्हानाचा सामना करावा लागला?

प्रत्येक वळणावर आव्हानांना सामोरे जावे लागते आणि आजही त्याला सामोरे जात आहे. कारण माझ्या शेवटच्या चित्रपटाने किती कमाई केली, त्यावरुन पुढचे करिअर ठरवले जाते. वर्षांपूर्वी मी एका सुपरहिट चित्रपटात काम केले होते, त्याच्या जोरावर मी आजही काम करत आहे, असे होत नाही. प्रत्येक प्रोजेक्टसोबत तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते. इतकी कॉम्पिटिशन वाढली आहे की, त्यात इतकी वर्षे टिकून राहणे हेच मोठे आव्हान आहे. यासोबतच स्वत:ला डेव्हलप करत राहणे, हेही एक मोठे आव्हान असते.

  • आगामी प्रोजोक्ट काय आहेत?

कोरोना महामारीनंतर आता चित्रपटगृह सुरु झाली आहेत. लॉकडाऊननंतर 19 नोव्हेंबरला माझा पहिला मराठी चित्रपट 'झिम्मा' प्रदर्शित होत आहे. हा अतिशय मनोरंजक चित्रपट आहे. यामध्ये सात महिला इंग्लंडला सहलीला जातात, तिथे जाऊन त्यांचे आयुष्य कसे बदलते, अशी एक हलकीफुलकी कथा आहे. यामध्ये मी आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करत आहे. यानंतर झी स्टुडिओचा 'पांडू' हा चित्रपट येतोय. हा एक कॉमेडी चित्रपट आहे, जो दादा कोंडके यांच्या पांडू हवालदारचा रिमेक आहे. यानंतर मी छत्रपती ताराराणीच्या शूटिंगसाठी यूकेला जाणार आहे.