आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटसृष्टीवर आणखी एक आघात:दिग्दर्शक-गीतकार प्रणीत कुलकर्णी यांच्यानंतर आता प्रसिद्ध संगीतकार अच्युत ठाकूर यांचे निधन, 20 दिवस रुग्णालयात होते दाखल

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘जांभूळ आख्यान’साठी अच्युत ठाकूर ओळखले जायचे.

मराठी चित्रपटसृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी आली आहे. सोमवारी प्रसिद्ध दिग्दर्शक आणि गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचे निधन झाले. 24 तास उलटत नाही तोच कोरोनाने मराठीतील प्रसिद्ध संगीतकार हिरावून घेतला आहे. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अच्युत ठाकूर यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते 69 वर्षांचे होते. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

20 दिवसांपासून रुग्णालयात होते दाखल

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पुण्यातील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेले वीस दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच आज (मंगळवारी) त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का आला आणि रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

चार दशकांहून अधिक काळ होते कार्यरत

अच्युत ठाकूर हे गेली चाळीसहून अधिक वर्षांहून अधिक काळापासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. 1983 मध्ये ‘श्री रामायण’ हा मराठी चित्रपट त्यांनी संगीतबद्ध केलेला पहिला चित्रपट होता. त्यानंतर ‘सौभाग्य वैंकण’, ‘पैज लग्नाची’, ‘घे भरारी’, ‘सत्ताधीश’, ‘गृहलक्ष्मी’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘आता लग्नाला चला’, ‘सर्जा राजा’सह अनेक चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. अनेक नाटकांसाठीही त्यांनी संगीतकाराची भूमिका बजावली. ‘चूप गुपचूप’, ‘तीन पैशांचा तमाशा’, ‘जांभूळ आख्यान’ ही नाटके रंगभूमीवर फार गाजली.

सोमवारी झाले होते लेखक-दिग्दर्शक-गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचे निधन

लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार प्रणीत कुलकर्णी यांचे 17 मे रोजी निधन झाले होते. ते 51 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते कर्करोगावर उपचार घेत होते. ‘देऊळबंद’ या गाजलेल्या चित्रपटाचे त्यांनी सहदिग्दर्शन केले आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘खतरनाक’, ‘उन उन वठातून’ ही गाणी गाजली. आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटासाठी काम केले. दिग्दर्शक प्रवीण तरडे, केदार शिंदे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्या आणखी आहेत...