आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर 'शुभारंभाचा नाट्यप्रयोग तुमच्या आवडत्या नाट्यगृहात 12 जुलै रोजी' असा मेसेज फिरला आणि सर्वांच्याच भुवया ऊंचावल्या. मराठी नाट्यरसिकांमध्ये जोरदार चर्चा झाली. नाटक सुरु होणार ही गोष्ट सुखावणारी असली तरी या पोस्टर व क्लिपने अनेक प्रश्नही रसिकांच्या मनात उभे राहिले. त्या सगळ्या शंकांची आणि प्रश्नांची उकल आता झाली आहे.
आपल्या सगळ्यांचा आवडता, हरहुन्नरी कलाकार हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले ‘नेटक’ म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक ‘मोगरा’चा रविवारी 12 जुलै रोजी शुभारंभाचा प्रयोग होत आहे.
तेजस रानडे यांनी लिहिलेल्या या नाटकात स्पृहा जोशी आणि भार्गवी चिरमुलेसुद्धा असणार आहेत. या नाटकाचा टीझर नुकताच रिलीज केला गेला. लॉकडाऊनच्या या काळात अशाप्रकारे इंटरनेटवरून सदर होणाऱ्या या नाटकाबद्दल मराठी रसिकांमध्ये प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.
हे नाटक नेमके कोणते, त्याचा दिग्दर्षक कोण, त्यातील कलाकार कोण, प्रेक्षकांनी ते नेमके कसे पाहायचे, लॉकडाऊनच्या या काळात सर्व चित्रपट-नाट्यगृहे बंद असताना सरकारकडून प्रयोगांना परवानगी कशी मिळाली, या आणि अशा अनेक प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
शेकडो वर्षांच्या इतिहासात मराठी रंगभूमीने अनेक आव्हाने पेलली, उलटवून लावली आणि ती नव्या उभारीने समर्थपणे उभी राहिली. निरनिराळे प्रयोग करत आणि बदल घडवून आणत रंगभूमीने आणि रंगकर्मींनी मराठी नाटक जिवंत ठेवले. ‘मोगरा’च्या माध्यमातून तोच अध्याय पुन्हा एकदा गिरविला जाणार आहे. मायबाप प्रेक्षक मराठी रंगभूमीने पेललेल्या प्रत्येक आव्हानाच्यावेळी खंबीरपणे नाटकाच्या मागे उभे राहीले आहेत. यावेळीही ते या प्रयोगाच्या मागे उभे राहतील, याची पूर्ण खात्री ठेवत हा अनोखा प्रयोग सादर होणार आहे, असे हृषिकेश जोशी म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.