आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
चंदेरी दुनियेचा झगमगाट विविध महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यांमधून आपल्याला पहायला मिळत असतो. मात्र कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने कलाविश्वातील हा झगमगाटाचा दिमाख काहीसा कमी झाला आहे. मनोरंजनाचा वसा घेत प्रेक्षकांना सातत्याने काहीतरी नवं देऊ पाहणाऱ्या कलाकारांनी नाउमेद न होता नवनवीन संकल्पना मांडल्या व यशस्वी केल्या. हीच उमेद व जोश घेऊन आता सातासमुद्रापार 'गल्फ सिने फेस्ट 2021' चे आयोजन करत पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या आरंभासाठी मराठी चित्रपटसृष्टी सज्ज झाली आहे. 'गल्फ सिने फेस्ट 2021'च्या माध्यमातून प्रथमच परदेशामध्ये 20 ते 23 जानेवारी दरम्यान मराठी चित्रपटांचा प्रीमियर सोहळा रंगणार आहे.
'गल्फ सिने फेस्ट 2021' ची संकल्पना खूप आगळीवेगळी असून यात बऱ्याच नाविन्यपूर्ण गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये 2021 या वर्षामधील बहुचर्चित पाच आगामी मराठी चित्रपटांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. सोबत चित्रपटांची टीमही यावेळी उपस्थित राहणार असून ते प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत. विशेष म्हणजे आगामी मराठी चित्रपटांचे ट्रेलर आणि टीझरही या सोहळ्यात दाखवले जाणार आहेत. उत्तम आशय विषयांच्या चित्रपटांची मेजवानी ही आखाती देशातील मराठी प्रेक्षकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे.
'5 जी इंटरनॅशनल'च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसाच्या या रंजक सोहळ्यात चित्रपटांच्या मेजवानीसह रंजक कार्यक्रमांची रेलचेल प्रेक्षकांसाठी असणार आहे. 'गल्फ सिने फेस्ट 2021' च्या निमित्ताने रंगणारा मनोरंजनाचा हा धमाकेदार सोहळा रसिकांसाठी एक वेगळी पर्वणी असणार हे नक्की.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.