आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

टीव्ही अपडेट:'ह. म. बने तु. म. बने' मालिकेला स्वल्पविराम!, या दिवशी प्रसारित होणार शेवटचा भाग; दुसरा सीझन लवकरच येणार

मुंबई19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मालिकेचा शेवटचा भाग 22 ऑक्टोबरला रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे.

काही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरतात आणि त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनतात, तशीच एक मलिका म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरची 'ह. म. बने तु. म. बने'! वाहिनी सुरू झाल्यापासून म्हणजे गेली दोन वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. प्रेक्षकांची पत्रं, मेसेजेस, कमेंट्स याद्वारे मालिकेवरचं प्रेक्षकांचं प्रेम वेळोवेळी दिसून येतं आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ही मालिका आवडते. बने आजी आणि आजोबा हे प्रत्येकाला आपल्या घरातले वाटतात. सई, रेहा आणि पार्थ हीसुद्धा प्रेक्षकांना आपल्याच घरातली मुलं वाटतात. या मालिकेने आणि मालिकेतल्या पात्रांनी प्रेक्षकांना माया लावली आहे.

सगळीकडे विभक्त कुटुंबपद्धती असताना या मालिकेतून एकत्र कुटुंबपद्धती आणि त्याच्या गमतीजमती दाखवल्या गेल्या. आई, आप्पा, मकरंद, मल्हार, तुलिका, हर्षदा, सई, रेहा आणि पार्थ या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्कचं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेनं आत्तापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं गेलं आहे. किन्नरांचे प्रश्न, मासिक पाळीचा विषय, किशोर वयातलं प्रेम या आणि अशा विविध विषयांवरले भाग प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळाले आहेत. मनोरंजनाबरोबरच पालकत्वाचे नवनवे धडे ह्या मालिकेनं दिले.

धकाधाकीच्या जीवनात 'ह. म. बने तु. म. बने' ही मालिका हलकंफुलकं मनोरंजन करते आणि त्यातून सामाजिक संदेशही देते. पण प्रत्येक गोष्ट ही कुठेतरी थांबते, थांबवावी लागते; त्याप्रमाणे 'ह. म. बने तु. म. बने' ही मालिकाही आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, पण हा शेवट नाही. मालिकेच्या पहिल्या सीजननंतरची ही विश्रांती आहे! प्रेक्षकांकडून मालिकेला मिळालेलं प्रेम पाहता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा येईल अशी आशा करायला हरकत नाही.

लॉकडाऊननंतर आप्पा आणि आई मालिकेत पुन्हा दिसू लागले आहेत. गेली 2 वर्षं मालिका रोज रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे. या मालिकेचा शेवटचा भाग 22 ऑक्टोबरला रात्री 10 वाजता प्रसारित होणार आहे. मालिकेच्या चाहत्यांसाठी ही निराश होण्यासारखी बातमी असली, तरी मालिकेवरलं प्रेक्षकांचं प्रेम पाहता मालिकेचा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येणार आहे.