आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना आराध्ये-जोशी यांच्या लग्नाचा आज नववा वाढदिवस आहे. या खास दिवशी स्वप्नीलने हटके अंदाजात आपल्या पत्नीला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर लीनासोबतचा एक फोटो शेअर करुन स्वप्नीलने रोमँटिक अंदाजात म्हणाला, "ही पोरगी पटली अरे ही मनात ठसली"....! याच दिवशी तू आणि मी एकत्र आलो आणि आयुष्य "स्वप्नील" झालं. प्रिय लीना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा आणि प्रेम...!"
स्वप्नील-लीनाचे अरेंज्ड मॅरेज
स्वप्नील-लीना 16 डिसेंबर 2011 रोजी लग्नाच्या बेडीत अडकले आणि स्वप्नील जोशी झाला औरंगाबादचा जावई. पण सिल्व्हर स्क्रिनवर लव्हस्टोरीज रंगवणा-या या मराठी सिनेसृष्टीतल्या हिरोचं लग्न 'अरेंज मॅरेज' होतं. त्यांचे लग्न जमण्याची ते अगदी लग्न लागेपर्यंतची संपूर्ण स्टोरी ही एखाद्या चित्रपटाला साजेशी अशी आहे. स्वप्नीलचे लीनासोबत हे दुसरे लग्न आहे. अकराव्या वर्गात असताना स्वप्नील आणि त्याची पहिली पत्नी अपर्णाचे सूत जुळले होते. पुढे त्यांनी लग्नही केले. मात्र फार काळ हे नाते टिकले नाही. लग्नाच्या केवळ चार वर्षांत स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. 2009 मध्ये तो अपर्णापासून कायदेशीररित्या विभक्त झाला. 2011 मध्ये स्वप्नीलच्या आयुष्यात लीनाचा प्रवेश झाला आणि त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली. या दोघांच्या संसारवेलीवर दोन गोंडस फुलं उमलली आहेत. मुलगी मायरा आणि मुलगा राघवची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात झाली आहे.
लीनासोबतची पहिली भेट
लीना आराध्येशी पहिली भेट कशी झाली आणि त्याचं प्रेमात रूपांतर कसं झालं याविषयी स्वप्नील जोशी सांगतो, लीना आणि मी मुंबईतच भेटलो. आमच्या पाहण्याच्या कार्यक्रमाला आम्ही दोघंच होतो. मी त्यादिवशी शुटिंग करत होतो आणि पॅकअप रात्री साडे अकरा वाजता झालं. रात्री साडे अकरा वाजता लीना माझी कॉफी शॉपमध्ये वाट पाहत होती. एखादी मुलगी आपल्याला भेटण्याअगोदर आपल्यावर एवढा विश्वास ठेवून रात्री-अपरात्री आपली वाट पाहते, यानेच मी भारावून गेलो. आम्ही भेटलो, आणि चक्क पहिल्या भेटीत आमचे असे सूर जुळले, की आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. लग्न करताना माझी महत्वाची अट होती की, तिने माझ्या आई-वडिलांसोबत राहावं. मी ही अट घालण्याअगोदरच तिने मला सासू-सास-यांसोबत राहायची इच्छा सांगितली आणि माझं मन जिकलं. त्याच रात्री निर्णय पक्का झाला, की हिच्याशीच लग्न करायचं.
...आणि स्वप्नील औरंगाबादला उशीरा पोहोचला
लग्न ठरल्यावर ऑगस्ट 2011 मध्ये स्वप्नील-लीनाचा साखरपुडा ठरला. साखरपुडा औरंगाबादला होता. स्वप्नील त्याच्या आईवडिलांसोबत बसने औरंगाबादला निघाला. पण पावसामूळे त्याला उशीर झाला. लीना सांगते, आधीच अॅक्टर त्यामुळे माहेरचे थोडे धास्तावलेले होते. त्यात सहाच्या साखरपुड्याला नवरदेवच नाही, म्हटल्यावर धाकधूक सुरू झाली. पण ती लोकं रात्री आठला पोहोचले आणि जीव भांड्यात पडला. मग मात्र लग्नावेळी रिस्क घेतली नाही. दोन दिवस अगोदर ट्रेननेच यायला सांगितलं.
मी माझ्या आईवडिलांचा जावई आहे का? असा प्रश्न स्वप्नीलला पडतो...
स्वप्नील आणि लीनाच्या मनात लग्न करताना मात्र अनामिक भीती दाटली होती. याविषयी स्वप्नील सांगतो, कोणत्याही लग्न करणा-या मुलाला दोन प्रश्न पडतात. एकतर माझ्या बायकोचं आणि माझ्या आईवडिलांचं जमेल ना? आणि माझी पत्नी सुखदु:खात मला साथ देईल ना? ही भीती कधीच विरून गेलीय. कारण लीना आता संसारात एवढी रमलीय, की मी माझ्या आईवडिलांचा जावई आहे का? असा प्रश्न मला पडावा. तिच्या त्यावेळच्या मनातल्या भीतीचं म्हणशील तर तिला मीच घाबरवलं होतं. तिने लग्नाअगोदर मला सांगितलं होतं की, मला लग्नानंतरही तेच नाव ठेवायचंय. मग काय, मी तिला लग्न होईपर्यंत खूप छळलं.. की आता मी तुझं नावचं बदलून टाकतो. पण अर्थातच ती मस्ती होती. तिचं आजही नाव तेच आहे.
लग्नाच्या 15 दिवसांआधी लीनाच्या वडिलांचे निधन झाले...
स्वप्नील-लीनाच्या लग्नाच्या 15 दिवस अगोदर लीनाचे वडील गेले. त्यामुळे एकीकडे आराध्ये कुटूंब दु:खात बुडलं असतानाच, लग्न पूढे ढकलणं त्यांना बरोबर वाटलं नाही. स्वप्नील-लीनाचं लग्न ठरल्याप्रमाणे 16 डिसेंबरलाच लावण्यात आलं. देशस्थ लीना कोकणस्थ स्वप्नीलची झाली. पण लग्नाचे विधी सुरू असतानाच ये इश्क नही आसान; हे लीनाला कळलं. ती म्हणते, कोकणात राहणारी लोकं नारळाने ओटी भरतात. माझी ओटी भरत असताना किंवा इतर काही कोकणस्थांच्या विधीला हे कसं करायचं, ते उमजत नव्हतं. पण घराघरातले विधी आणि पध्दती वेगळेच असतात. त्यामुळे ते एवढं विशेष वाटलं नाही. जेवढं बाइट देणं वाटलं.
बाइट देणं म्हणजे काय?
बाइट देणं या प्रकाराविषयी लीना सांगते, टीव्ही इंडस्ट्रीत बाइट देणं; हा फारच चिरपरिचीत शब्द आहे. टीव्हीच्या कॅमे-यासमोर माईक घेऊन बोलण्याला साऊंड बाइट असं म्हटलं जातं. त्याचा शॉर्टफॉर्म आहे बाइट. आमच्या औरंगाबादेतल्या लग्नाला सचिन पिळगांवकर आले होते. त्यावेळी एकापेक्षा एक हा शो स्वप्नील करत होता. त्यांनी मला कॅमेरा पुढे नेत म्हटलं. सांग अवघ्या महाराष्ट्राला की आमच्या लग्नामुळे काही दिवस स्वप्नील तुम्हांला दिसू शकणार नाही. कॅमे-यसमोर आयुष्यात पहिल्यांदा उभी राहिले आणि खूप घाबरले. माझं घाबरलेपण कॅमे-यात कैद झालं.
लग्नाच्या पहिल्या रात्रीची फजिती...
आपल्या लग्नानंतरची पहिली रात्र कशी होती, हे सांगताना लीना पुढे म्हणते, लग्नानंतर आम्ही माझ्या घरीच राहिलो होतो. त्या रात्री माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रमैत्रिणींनी आम्हाला खूप छळलं. आमच्याच खोलीत बसून ते मुद्दामहून गाण्याच्या भेंड्या खेळत होते. रात्री 3 वाजता शेवटी आम्ही झोपण्याचं नाटक केलं. तेव्हा ती मंडळी गेली.
स्वप्नीलच्या घरी जंगी स्वागत...
लीना म्हणते, दुस-या दिवशी स्वप्नीलच्या घरी आल्यावर माझं जंगी स्वागत झालं. पण रात्री माहेरच्यासारखंच स्वप्नीलच्या नातेवाईकांपैकी प्रत्येकाने दर दहा मिनीटांनी एक गुलाबाचं फुल देऊन आम्हाला चांगलंच लाजवलं.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.