आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा25 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झालेल्या 'हर हर महादेव' या ऐतिहासिक चित्रपटावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल चुकीचा इतिहास दाखवण्यात आल्याने छत्रपती संभाजीराजे आणि संभाजी ब्रिगेड यांनी या चित्रपटाविरुद्ध आवाज उठवला होता. संभाजीराजे यांनी झी स्टुडिओला याबद्दल इशाराही दिला होता. तरीही चित्रपट 18 डिसेंबर रोजी झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्याची घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर मात्र संभाजी ब्रिगेडने चित्रपट प्रदर्शित केल्यास वाईट परिणाम होतील, असा अखेरचा इशारा झी स्टुडिओला दिला होता. अखेर झी स्टुडिओने संभाजीराजे आणि संभाजी ब्रिगेडसमोर नमते घेतले आहे. चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये वगळूनच हा चित्रपट प्रक्षेपित केला जाणार असल्याचे झी स्टुडिओने म्हटले आहे.
"आज आपण बैठकीत चर्चा केल्याप्रमाणे ‘हर हर महादेव’ या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्य आणि प्रसंग वगळण्याचा किंवा ते हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हे दृश्य हटवल्यानंतरच येत्या 18 डिसेंबर 2022 रोजी हा चित्रपट झी मराठी वाहिनीवर प्रक्षेपित केला जाईल, याची नोंद घ्यावी", असे या पत्रात म्हटले आहे. आता झी स्टुडिओ चित्रपटातील कोणकोणत्या सीनवर कात्री मारणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.
नेमके काय आहे संपूर्ण प्रकरण?
‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा वाद गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरु आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यातील लढाईवरुन वाद निर्माण झाला होता. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, सरदार कृष्णाजी बांदल यांच्याबाबत अतिशय चुकीचा आणि आक्षेपार्ह इतिहास मांडल्याचे बोलले जात आहे. या विरोधात संभाजी ब्रिगेडने चित्रपटगृह बंद पाडली होती. येत्या 18 डिसेंबरला हा चित्रपट झी मराठी वाहिनीनेदाखवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला संभाजी ब्रिगेडने कडाडून विरोध केला. 14 डिसेंबर रोजी झी स्टुडिओच्या मुंबईतील कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी याबद्दल परखड भूमिका घेतली होती. त्यानंतर झी स्टुडिओने हा निर्णय घेतला आहे.
सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला आणि अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात दाखल झाला होता. या चित्रपटाला संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेसह राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. पण हा विरोध डावलून येत्या 18 डिसेंबर रोजी या चित्रपटाचा झी मराठी वाहिनीवर टेलिव्हिजन प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. पण अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.