आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हर हर महादेव'च्या TV प्रिमिअरबद्दल अखेरचा इशारा:स्वराज्य संघटना आक्रमक; 'सरसेनापती हंबीरराव'ही त्याच दिवशी होणार प्रसारित

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुबोध भावेची प्रमुख भूमिका असलेला आणि अभिजीत देशपांडे दिग्दर्शित 'हर हर महादेव' हा चित्रपट 25 ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात दाखल झाला होता. या चित्रपटाला संभाजीराजे छत्रपती आणि स्वराज्य संघटनेसह राज्यभरात अनेक स्तरांतून विरोध झाला होता. पण हा विरोध डावलून येत्या 18 डिसेंबर रोजी या चित्रपटाचा झी मराठी वाहिनीवर टेलिव्हिजन प्रिमिअर होणार आहे. त्यामुळे हा वादग्रस्त चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, असे पत्र संभाजीराजे छत्रपती यांनी झी स्टुडिओच्या व्यवस्थापनास दिलेले होते. पण अजूनही झी मराठी वाहिनीवर हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याची जाहिरात दाखविली जात आहे.

आज स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी विनोद साबळे आणि अंकुश कदम यांनी झी स्टुडिओच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष जाऊन व्यवस्थापनास इशारा दिलेला आहे. 'हर हर महादेव' हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची लेखी हमी त्यांनी मागितली असून, छत्रपती संभाजीराजे यांचे पत्र आणि समस्त शिवभक्तांच्या भावनेकडे दुर्लक्ष करून चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्यास झी स्टुडिओ व्यवस्थापन जबाबदार असेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी दिला होता इशारा
हर हर महादेव हा चित्रपट थिएटरमध्ये बंद पडल्यानंतर आता 18 डिसेंबर रोजी झी मराठी या वाहिनीवर तो प्रदर्शित केला जाणार आहे. इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला व तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावणारा हा चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित करू नये, याबाबत स्वराज्य संघटनेने झी स्टुडीओला पत्र लिहून सूचित केले आहे. या सूचनेकडे कानाडोळा करून हर हर महादेव चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित केल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना झी स्टुडिओ जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिला होता.

18 डिसेंबरलाच टीव्हीवर दाखवला जाणार 'सरसेनापती हंबीरराव'
'हर हर महादेव' चित्रपट झी मराठी वाहिनीवर तर 'सरसेनापती हंबीरराव' हा चित्रपट स्टार प्रवाह वाहिनीवर 18 डिसेंबरला प्रसारित केला जाणार आहे. 'हर हर महादेव' झी मराठीवर 18 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता पाहता येईल. तर सरसेनापती हंबीरराव स्टार प्रवाहवर याच दिवशी दुपारी 1 वाजता प्रसारित केला जाईल. त्यामुळे दुपारच्या वेळात यापैकी कोणत्या चित्रपटाला प्रेक्षक पसंती देतील हे बघावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...