आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाई, बूब्स आणि ब्रा’:‘पोस्ट’च्या माध्यमातून नजरा स्वच्छ होतील, असंख्य ‘टॅबू’ची अवगुंठने सरकतील...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ मुद्द्यावरून उठलेल्या गदारोळाचे हेमांगी कवी यांनी केलेले पोस्टमाॅर्टेम

हेमांगी कवी
प्रसिद्ध अभिनेत्री हेमांगी कवी यांनी काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर लिहिलेली ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या शीर्षकाची पोस्ट केवळ सोशल मीडियाच नव्हे, तर अन्य व्यासपीठांवरही व्हायरल झाली. या पोस्टसंदर्भातील लेखिकेचा मूळ उद्देश, पार्श्वभूमी, वैचारिक बैठक, मानसिकता... यासंदर्भातही चर्चा झाली. पत्रकारितेच्या विश्वात बातमी जशी महत्त्वाची, बातमीमागील बातमी महत्त्वाची तसेच बातमीनंतरचे हॅपनिंग (‘पोस्ट’नंतरची ‘पोस्ट’) हेही महत्त्वाचे असते. या दृष्टीने लेखिका हेमांगी कवी यांची ‘पोस्टनंतरची पोस्ट’या मुद्द्यावरील मते त्यांच्याच शब्दांत...

मी लिहिलेल्या ‘पोस्ट’वर प्रतिक्रिया उमटतील हे अपेक्षितच होतं. पण त्यांच्या जोडीनं ‘प्रतिसाद’ही मिळाला याचं छोटंसं का होईना समाधान आहे. काही टॅबू फ्री व्यक्तींना तरी माझ्या पोस्टमागील उद्देश पोहोचला आहे असं मी नक्की म्हणू शकते. अर्थात, हे पुरेसं नाही याची मला जाणीव आहे. त्यामुळे पोस्टिंग सुरूच ठेवावं लागेल. हळूहळू का होईना काही बदल घडतील, नजरा स्वच्छ होतील आणि स्त्रियांची असंख्य ‘टॅबू’ची अवगुंठने सरकतील अशी मला आशा आहे….

‘मी ही पोस्ट लिहिली हे काही प्रथमच केले असे नाही. मी समाजमाध्यमांवर आधीपासून सातत्याने वावरते आणि अनेक विषयांवर (जे मला खटकतात) वारंवार लिहीतही असते. त्या लेखनाची चर्चाही होते. मात्र, ही पोस्ट अधिक व्हायरल झाली हे मान्य करायला हवे. पिढ्यान््पिढ्या आपल्याकडे अनेक गोष्टींचे ‘कंडिशनिंग’ झाले असल्याने हा गदारोळ उठतो आहे असे मला वाटते. अगदी नैसर्गिक-सहज अशा गोष्टी-कृती आपल्या समाजाने विनाकारण ‘झाकून’ ठेवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. माझ्या पोस्टवर हजारो कमेंट्स, लाइक्स आल्या आणि पोस्ट शेअरही झाली. समर्थन करणाऱ्या, पाठिंबा देणाऱ्या स्त्रिया त्यात होत्याच. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की, विरोध करणाऱ्या, टीका करणाऱ्या, उपहास करणाऱ्यांमध्ये स्त्रिया अधिक आहेत. अगदी वैद्यकीय आणि वकिलीचे शिक्षण घेतलेल्या स्त्रियाही यात सहभागी आहेत. साधं आपल्या घरातही आपण आपल्याला हव्या त्या मोकळेपणानं वावरणार की नाही? तिथेही असे असंख्य ‘टॅबू’ घेऊन राहणार? जी मोकळेपणानं वावरेल तिला ‘विकृत’ ठरवणार का? तिच्या थेट ‘चारित्र्या’वरच बोट दाखवणार का? तिला ‘अनैतिक’ म्हणणार का? असे प्रश्न आता मला पडू लागले आहेत.

आधुनिक काळातही फक्त साधनं बदलली असतील. मीम्स, ट्रोल केलं जातंय. ‘अवसान’ घेऊन कमेंट्स होत आहेत. हे सारं ‘सोयीस्करपणे’ केलं जातंय. कारण एखाद्या गोष्टीवर ‘टॅबू’ लावला की, खूप काही स्वत:च्या सोयीनं पडद्याआड करता येतं. त्याऐवजी विकृत नजरा ‘साफ’ करणं, ‘निकोप’ करणं मला महत्त्वाचं वाटतं आणि वाटत राहील. पोस्टमागील विचार समजून घेण्यासाठी ही पोस्ट म्हणजे सनसनाटी, लक्षवेधक काही करण्याची ही ट्रिक नाही हे वाचकांनी समजून घ्यावं. मला जे खटकतं, ज्यावर मोकळेपणानं बोलावं असं वाटतं, केवळ टॅबू लावून गोष्टी दडवू नयेत असं वाटतं, त्यावर मी व्यक्त होत राहीनच. शेकडो वर्षांपासून स्त्रियांचं विशिष्ट पद्धतीनं झालेलं कंडिशनिंग त्यांना जाणवावं आणि त्यातून स्त्रियांनी मोकळा श्वास घ्यावा एवढ्यासाठीच तर हे सारं आहे.

माझ्या मनात विषयाची स्पष्टता
अर्थात, माझ्या पोस्टवरच्या कमेंट्स, लाइक्स, शेअरिंग पाहून हुरळून जाणारी किंवा निराश होणारी मी नाही. मी काय लिहिले, कशासाठी लिहिले, कुणासाठी लिहिले, का लिहिले.. या साऱ्यांविषयीची स्पष्टता माझ्या मनात आहे. पोस्टच्या अनुषंगाने मी म्हणेन की, शाळेत शिकायला जाणारी पहिली मुलगी, पहिली स्त्री… यांनी काय अनुभवलं असेल? तिलाही चेष्टा, उपहास, उपरोध, विरोध, विनोद आणि संघर्षातून वाटचाल करावी लागली. माझाही अपवाद नाही असे मी म्हणेन.

बातम्या आणखी आहेत...